सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (18:59 IST)

झुकेरबर्गने घेतला मोठा निर्णय, मेटा कंपनीने 11000 कर्मचाऱ्यांना काढले

mark zuckerberg
फेसबूकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 13 टक्के लोकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण 87,000 कर्मचाऱ्यांपैकी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे. मेटा कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. कंपनीचे अध्यक्ष मार्क झकरबर्ग यांच्या मते मेटाच्या इतिहासातला हा सगळ्यांत मोठा बदल आहे. गेल्या आठवड्यात ट्विटर कंपनीनेही अशीच कर्मचारी कपात केली होती आणि त्यामुळे मोठा गहजब झाला होता.
 
“हा सगळ्यांसाठी अतिशय कठीण काळ आहे याची मला कल्पना आहे. ज्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम झाला आहे त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत आहे.” असं मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं आहे.
 
“ही वाढ  अशीच चालू राहील असं अनेकांना वाटलं. मलाही तसंच वाटलं. त्यामुळे मी पण गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली.” ते म्हणाले.
 
मात्र आर्थिक स्थितीमुळे आणि वाढलेल्या स्पर्धेमुळे उत्पन्नात घट झाली असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
“माझी चूक झाली आणि मी त्याची जबाबदारी घेतो.” झकरबर्ग म्हणाले.
 
कर्मचारी कपातीबाबत कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाच्यावेळी मार्क झकरबर्ग यांनी स्पष्ट केलं होतं.
 
“2023 मध्ये ज्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य द्यायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.” असं त्यांनी सांगितलं होतं.
 
मेटा कंपनीत एकूण 87000 काम करतात. फेसबूक, इन्स्टाग्राम, आणि व्हॉट्स अप या तिन्ही कंपन्यांची मालकी त्यांच्याकडे आहे.
 
जागतिक पातळीवर आर्थिक विकास मंदावला आहे त्यामुळे या कर्मचारी कपातीमुळे आणखी तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
पुढच्या वर्षापर्यंत काही टीम्सच्या नोकऱ्या जाण्याची किंवा त्यांचं आकारमान कमी होण्याची शक्यता वर्तवली होती.
 
“2023 मध्ये आपण आहोत तितकेच राहू किंवा कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.” ते पुढे म्हणाले.
 
फेसबूक आणि गुगल या कंपन्या जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. सध्याची आर्थिक स्थिती पाहता जाहिरातदारांनी त्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. त्याचाच फटका या कंपन्यांना बसला आहे.
 
गेल्या गुरुवारी  स्ट्राईप आणि लिफ्ट यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. अमेझॉन कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये कोणतीही भरती करणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
Edited by - Priya Dixit