शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (19:50 IST)

लता मंगेशकरांवर 13व्या वर्षीच घराबाहेर पडण्याची वेळ आली होती कारण...

आपल्या जादुई आवाजाने संगीतरसिकांना अभूतपूर्व आनंद देणाऱ्या लतादीदींचं बालपण अतिशय खडतर होतं.
 
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात गुरुद्वाराजवळच्या शीख मोहल्ला गल्लीत भागात घर क्रमांक22 मध्ये हेमा नावाच्या मुलीचा जन्म झाला. संगीत नाटकातल्या लतिकेच्या भूमिकेवरून त्या मुलीला लता हे नाव मिळालं. पुढे अनेक दशकं या नावाचं भारतीयांवर गारुड आहे.
 
मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर यांची मोठी लेक असलेल्या लता यांनी पाचव्या वर्षापासून गाणं शिकू लागल्या. लेकीची गाण्यातली प्रतिभा दीनानाथ यांनी हेरली होती. पण 13व्या वर्षी लता यांचं पितृछत्र हरपलं.
 
तीन लहान बहिणी, एक भाऊ आणि आई या कुटुंबाची जबाबदारी लता यांच्यावर आली. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही लतादीदींची सख्खी भावंडं.
 
मास्टर दीनानाथांचे मित्र आणि कलाकार विनायक दामोदर कर्नाटकी यांनी लतादीदींना प्रशिक्षण दिलं. त्यांची कंपनी मुंबईला स्थलांतरित झाल्याने लतादीदीही मुंबईत आल्या. उस्ताद अमानत अली खान यांच्याकडे गाणं शिकू लागल्या. फाळणीमुळे अमानत अली खान पाकिस्तानला गेले.
 
त्यानंतर लतादीदी पंडित तुलसीदास शर्मा आणि ए.के. देवासवाले यांच्याकडे शिकू लागल्या. त्यांचे गुरु विनायक दामोदर यांचं 1948 मध्ये निधन झालं. लतादीदींच्या कारकीर्दीसाठी हा मोठा धक्का होता. पण संगीत संयोजक गुलाम हैदर यांनी लतादीदींना मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली.
 
सहा वर्ष संघर्ष केल्यानंतर लतादीदींचं आयेगा आनेवाला हे महल चित्रपटातलं गाणं प्रचंड गाजलं. त्यानंतर लतादीदींची अद्भुत अशी कारकीर्द सुरू झाली ती अव्याहतपणे अनेक दशकं सुरूच राहिली.
 
'ग्रेट भेट' कार्यक्रमादरम्यान निखिल वागळेंना दिलेल्या मुलाखतीदरम्यान लतादीदींनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
 
त्या सांगतात, "मला डॉक्टर किंवा प्रोफेसर व्हायचं होतं. याचं कारण होतं ते म्हणजे मी शाळेतच गेले नाही. मला बिगारीत घालण्यात आलं. सांगलीला आमच्या घराजवळ ती शाळा होती. फळ्यावर लिहून दिलेलं मी लिहिलं. मास्तर पगडी, उपरणं अशा पारंपरिक वेशातले होते. तुला 10पैकी 11 गुण. मला प्रचंड आनंद झाला. घरी जाऊन माईला सांगितलं. घरच्यांनी कौतुक केलं. तू शिकतेस चांगलं".
 
"तो पहिलाच दिवस होता. दुसऱ्या दिवशी सात-आठ महिन्यांची आशा होती. मी तिला कडेवर घेतलं आणि शाळेत गेले. तेच मास्तर होते. लहान मुलांना घेऊन इथे यायचं नाही असं त्यांनी सांगितलं. मी आशाला घेतलं आणि घरी आले. माईला सांगितलं, मी शाळेत जाणार नाही. काही हरकत नाही, नको जाऊस असं माईने सांगितलं.
 
"मी मास्टर दीनानाथांची मुलगी आहे, मास्तरांचं असं ऐकून घेणार नाही असं बोलले. हा वेडेपणा होता. आमच्या घरी विठू नावाचा नोकर होता. त्याच्याकडे बाराखड्या वगैरे शिकले. त्याला जेवढं माहिती होतं तेवढं तो शिकवायचा. फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर इंग्रजी शिकण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली. मी बऱ्याच भाषा शिकले, त्याच्यात मला आनंद मिळतो.
 
"बंगाली, पंजाबी येतं. बोलायला, गायला छान वाटतं. शांता आपटेंबरोबर काम करताना त्यांनी तामीळ सिनेमात काम केल्याचं सांगितलं. ते कुठे असतं मी विचारलं. मद्रासकडे असतं असं त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या भाषात गायला पाहिजे. भाषा शिकल्या पाहिजेत असं वाटलं".
 
वैयक्तिक आयुष्याबाबत विचारलं असता लतादीदींनी सांगितलं, "एका मुलाने लग्न करण्याची इच्छा आहे असं लिहिलं होतं. पण मला या सगळ्याचा विचार करायचा नाहीये असं सांगितलं. कारण समाधानकारक पैसे हाती यायला खूप दिवस लागले. कामाला सुरुवात केली तेव्हा एका गाण्यासाठी 200 किंवा 300 रुपये मिळायचे. माझ्याकडे पैसेही नसायचे.
 
"मौजमजा करावी असं कधीच वाटलं नाही. माझ्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती ते म्हणजे बाबा गेल्यानंतर माई, मीना, आशा, उषा, हृदयनाथ (तो पायाच्या दुखण्याने आजारी होता) त्यांच्याकडे माझं जास्त लक्ष होतं. ओढा होता. ते बरे असावेत असं मला वाटायचं. त्यांना कोणताही त्रास होऊ नये. हे सारखं वाटायचं".
 
"कौटुंबिक जबाबदारी आणि स्वत:चा एक झगडा असतो याच्यावर मात माझ्या कुटुंबाने केली. मला त्यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे, आता सगळे सेटल्ड आहेत. सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. तरीसुद्धा माझ्यावर जबाबदारी आहे असं मला वाटतं. वैयक्तिक आयुष्य असावं, कुटुंब असावं असं वाटलं नाही.
 
"वाटलंही असेल तरी माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक माणसाला लग्न, जन्म आणि मृत्यू हे ठरलेल्या वेळेला येतं. आलं नाही तर समजावं नाही. आलं तर समजावं आलं. या तीन गोष्टींवरती माणसाचं नियंत्रण नाही. माझा देवावर विश्वास आहे", असं लतादीदींनी सांगितलं.
 
"मला काम करायचं होतं. माईने मुलगा आणला होता. पण मी नकार दिला. लग्न केलं असतं मला त्याच्या घरी जाऊन राहायला लागलं असतं. या सगळ्या लोकांना कुणी बघितलं असतं"? असा सवाल लतादीदींनी केला होता.
 
लतादीदी ऊर्दू का शिकल्या?
दिलीप कुमार ट्रेनमध्ये भेटले. आम्ही मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये जात होतो. अनिल विश्वास बरोबर होते. ते दिलीप कुमारांना म्हणाले, युसुफ ही लता मंगेशकर आहे. बहोत अच्छा गाती है.
 
युसुफभाई म्हणाले, मंगेशकर-म्हणजे तुम्ही मराठी आहात. मराठी लोकांच्या ऊर्दू उच्चारणात दालचावल की भूल होती है. ते असं बोलले. ती गोष्ट मनाला लागली. ऊर्दू येत नाही, हिंदी येत नाही याचं वाईट वाटलं.
 
उर्दू शिकवणारा माणूस द्या असं सांगितलं. त्यांनी मौलाना मेहबूब यांचं नाव सांगितलं. त्यांनी ऊर्दू शिकवलं. पुष्कळ पुस्तकं आणली. ते वाचायला लागले, शिकायला लागले. त्याच्याआधी मी हिंदी शिकले होते. आपले उच्चार वाईट होता कामा नयेत. मग तामीळ, बंगाली, पंजाबी शिकत गेले.
 
मी दुसऱ्या भाषेतलं गाणं म्हणण्याआधी कवी, संगीत संयोजक, दिग्दर्शक यांच्याशी बोलते. शब्दाचा अर्थ विचारते, प्रसंग काय आहे ते समजून घेते. शब्दाचा अर्थ कळला की त्याहिशोबाने गाते. ही माझी कामाची पद्धत आहे. शब्दांचा अर्थ समजला नाही तर मी गात नाही.