विखे पाटील देणार मोठा धक्का, बारा आमदार राहणार सोबत
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी कोण येणार हे पहावे लागणार आहे. नवीन नेता निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडून मुंबईत बैठक सुद्धा झाली होती. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटलांसह 12 आमदारांनी दांडी मारली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे किमान 12 आमदार पक्षांतर करणार असे चित्र निर्माण झाले आहे. त्याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. असे जर झाले तर भाजपची ताकद वाढणार असून विखे यांना मोठे पद मिळेल.
विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नवा नेता निवडीसाठी विधानभवनात काँग्रेस आमदारांची बैठक झाली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे देखील भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे हे आमदार बैठकीकडे फिरकलेच नाहीत. तर काही आमदारांनी आजारी असल्याचं कारण पुढे केले आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विदेशात असल्याने ते बैठकीला आले नाहीत.