घड्याळाचे बटन दाबले, तर मत कमळाला गेले
आपण घड्याळाचे बटन दाबले, तर मत कमळाला गेले. याचा मी स्वत: अनुभव घेतला आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ईव्हीएम बद्दल पवार म्हणाले की हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी ईव्हीएम यंत्र माझ्यासमोर ठेवले आणि मला बटन दाबायला सांगितले. तेव्हा मी घडयाळापुढचं बटन दाबल्यावर मत कमळाला गेल्याचे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. अर्थात सर्वच यंत्रांमध्ये असं होईल असं नाही, मात्र मी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने मला चिंता वाटते असेही त्यांनी सांगितले. याच चिंतेपोटी आम्ही ५० टक्के व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजाव्या म्हणून न्यायालयात गेलो होतो मात्र कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही, असेही त्यांनी सांगितले.