बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (09:50 IST)

मगोप दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश

गोव्यात मध्यरात्री घडलेल्या राजकीय घडामोडीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर अशी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांची नावे आहेत. त्यांनी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचे पत्रही गोवा विधानसभेचे सभापती मायकल लोबो यांना सादर केले आहे. यामुळे मगो पक्षाचे सुदीन ढवळीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
मगो पक्षाचे दोन आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने भाजपचे विधानसभेतील संख्याबळ १४ झाले आहे. दरम्यान, मगो पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी मात्र सभापतींना सादर केलेल्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. मगोच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मगो पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे मगो पक्षाच्या दोन आमदारांनी गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.