गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (21:10 IST)

जायफळापासून बनवला वेदनाशमक जेल; पेटंट मिळाल्याने सर्वत्र कौतुक

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एससमबीटी  कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश उशीर व प्राध्यापक डॉ सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. पुढील २० वर्षांपर्यंत या पेटंटचे ‘एसएमबीटी’कडे अधिकार असणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभ्यासपूर्ण केलेल्या संशोधनामुळे मिळालेल्या या विशिष्ट पेटंटनंतर डॉ उशीर यांच्यासह एसएमबीटीमधील सहकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
अधिक माहिती अशी की, लहानपणी आजी काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी वेदनाशामक असून शरीराची दुखणे कमी करण्यास रामबाण उपाय ठरू शकतात असे निदर्शनास आले. या संशोधनाबाबत अधिक माहिती देत डॉ उशीर म्हणाले की, जायफळ वेदनाशामक औषध असून इतर वेदनाशामक औषधांनादेखील ते बुस्टर म्हणून काम करू शकते आहे. या औषधाच्या अनेक चाचण्या झाल्या यासोबतच गुणवत्तेचीदेखील पडताळणी करण्यात आली.
 
या प्रकारातील संशोधन यापूर्वी कुठेही झालेले नाही असेही पटवून देण्यात आले. या औषधाच्या उत्पादनासाठीची यंत्रणा कशी काम करणार? तसेच अधिक प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास काय करावे? पेटंट नोंदणी झाल्यानंतर औषधाला सर्वसामान्य रुग्णांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवावयाचे याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्वांच्या कार्याबद्दल एसएमबीटी व्यवस्थापनाकडून  सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले.  
 
चौकट
नाशिकमधील एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयात अनेक नवनवीन संशोधनांवर काम सुरु आहे. यातील पहिल्या प्रयत्नाला यश आले आहे. येणाऱ्या काळात आणखी काही पेटंट आपणास मिळतील. या जेलचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होणार असून इतर वेदनाशामक जेलच्या तुलनेत या जेलची किंमत कमी राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. योगेश उशीर, प्राचार्य, येथील एससमबीटी  कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी
 
जेल असा काम करणार...
हर्बल प्रकारात हे प्रोडक्ट मोडणार आहे. अनेक नागरिकांना वयोमानानुसार, गुडघेदुखीचा त्रास असतो, शरीरावर सूज येते, सांधेदुखी सारख्या असह्य आजारांचा त्रास असतो. बाजारातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मलममुळे फरक न पडलेल्या रुग्णांना या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. साईड इफेक्टस टाळण्यासाठी आता बहुतांश नागरिक आयुर्वेदाकडे वळले आहेत. त्यामुळे हा जेल रामबाण उपाय म्हणून काम करणार यात शंका नाही.
 
आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग
आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती परिषदांमध्ये एसएमबीटी फार्मसीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया व  मलेशिया या देशांत प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली आहे. इतर देशातील अनेक तज्ञ यानिमित्ताने जोडले गेले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor