शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: लातूर , गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (09:26 IST)

भारतीय जनता पक्षाची सारीच मंडळी सत्तेच्या नशेत बेधुंद - अमित देशमुख

भारतीय जनता पक्षाची सारीच मंडळी सत्तेच्या नशेत बेधुंद झाली आहे. त्यांना सामान्य माणसाचा विसर पडला आहे. कर आणि भाडे अनेकपटीने वाढवण्यात आले आहेत. वाढ असावी पण ती नैसर्गिक असावी असे मत आ. अमित देशमुख यांनी सांगितले. लातूर मनपाने लादलेला अवाजवी गाळे भाडेवाढ आणि अवाजवी मालमत्ता कर थांबवावेत आणि नव्याने दर ठरवावेत. सर्वसमावेशरित्या फेरीवाला धोरण अमलात आणावे या मागणीसाठी मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक आणि लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज लातूर मनपावर मोर्चा काढण्यात आला.
 
हजाराहून अधिक संख्येनं आलेला हा मोर्चा मनपाचे कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर अडवू शकले नाहीत. मोर्चेकर्‍यांनी प्रांगणातच बैठक मारली. या ठिकाणी आ. अमित देशमुख, अशोक गोविंदपूरकर, मोईज शेख, दीपक सूळ, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
 
लातूर शहरातील मनपा गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. व्यापार्‍यांनी भाडेवाढ मान्य नाही. रेडीरेकनर कसा काढला, तो कोणत्या वर्षाचा आहे, बांधकामाचे वर्ष गृहेत धरुन त्याचा घसाराही देण्यात आला नाही. संकुलातील आतील दुकानांना वेगळे आणि रस्त्यावरील दुकानांना भाडे आकारले जात आहे. भाड्यात १० ते १५ पट वाढ करण्यात आली आहे. या धक्क्याने एका व्यापार्‍याचा मृत्यूही झाला. व्यापार्‍यांशी विचार विनिमय करुन नवे दर ठरवावे, तोपर्यंत जुन्या दराने वसुली करावी, नुकतीच न्यायालयानेही मालमत्ता करवाढीस स्थगिती दिली आहे. असेही यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.