या मंदिरात कैदी वाहतात बेड्या
इच्छापूर्तीसाठी नवस करण्याची प्रथा आपल्या भारतवर्षात फार प्राचीन आहे. मग इच्छा पूर्ण झाली की देवाला जाऊन नवस फेडायचा. नवस बोलताना जी वस्तू काबूल केली असेल ती देवाला नेऊन वाहायची अशी ही पद्धत. नवस फेडीसाठी कितीतरी विविध प्रकारच्या वस्तू देवाला वाहिल्या जातात. मध्यप्रदेशातील जालीनेर गावात एक मंदिर असून येथे देवळात नवस फेड म्हणून हातकड्या किंवा बेड्या वाहण्याची प्रथा आहे. ही प्रथा गेली 50 वर्षे पाळली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या देवळात जसे सर्वसामान्य लोक दर्शन व पूजेसाठी येतात तसेच कैदी आणि स्मगलरही येथे पूजा करू शकतात. खाख्खर देव असे नाव असलेले हे मंदिर नागदेवतेला समर्पित आहे. येथे तुरुंगातून सुटका व्हावी, जामीन मिळावा म्हणून कैदी, स्मगलर चोरून रात्री येऊन पूजा करतात आणि नवस पूर्ण झाला की बेड्या आणून देवाला अर्पण करतात असे समजते.