बुलडाण्याच्या मृत महिलेला तामिलनाडूत कोरोना लस
बुलडाण्यातील एका मृत महिलेला तमिळनाडूत कोविड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित महिलेचा सात महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असताना त्यांनी तामिळनाडूमध्ये लस घेतल्याचा मेसेज आला आहे. या प्रकारामुळे महिलेचे नातेवाईक गोंधळून गेले आहेत.
यासोबत लसीकरण केल्याचं प्रमाणपत्र देखील पाठवण्यात आलं आहे. सखूबाई गोपाळ बरडे (75) यांचे 17 एप्रिल रोजी निधन झाले. शहरातील आढाव गल्लीत राहणार्या या कुटुंबात मृत महिलेचे पती गोपाळराव, मुलगा राजेश व परिवार आहे. दरम्यान, राजेश बरडे यांच्या मोबाईलवर मंगळवारी एक मेसेज आला. बरडे यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्याचा तो संदेश होता. सखूबाई यांचा मुलगा राजेश याने मेसेजमधील लिकंवर जाऊन सर्टिफिकेट डाऊनलोड केले असता ते तमिळानाडू राज्यातील सर्टिफिकेट आले.
त्यात 26 ऑक्टोबर 2021 रोजी लसीकरण झाल्याचा उल्लेख आहे. तमिळ आणि इंग्रजीत असलेले हे सर्टिफिकेय बघून सखूबाई यांच्या नातेवाईकांना धक्का बसला. या प्रकरणाने शतकोटी लसीकरण पूर्ण करणार्या भारतातील लसीकरणाचा गोंधळ निदर्शनास येतो.
विशेष म्हणजे मृत व्यक्तीला लस दिल्याची ही पहिलीच घटना नाही. तर अशाप्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवासी येथील एका मृत व्यक्तीला लस दिल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता.