मानहानीकारक ट्वीट डिलीट करा, बिनशर्त माफी मागा: मलिक यांना अमृता फडणवीस यांची कायदेशीर नोटीस
अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांचे जावई समीर खान यांनी बुधवारी, 10 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली होती. फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिक यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीशीत म्हटलंय की, नवाब मलिकांनी ट्विटरवरून त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन केली.
अमृता यांनी आपल्या नोटीशीत म्हटलं की, "हे मानहानीकारक ट्वीट डिलीट करा. तसंच येत्या 48 तासात पत्रकार परिषद घेऊन बिनशर्त माफी मागा आणि असं म्हणा की केलेल्या आरोप आधारहीन आहेत."
या कायदेशीर नोटीशीत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या ट्वीटचे स्क्रीनशॉटही लावले आहेत.
अमृता फडणवीस यांनी दिलेल्या कायदेशीर नोटीशीत लिहिलंय, "नवाब मलिकांच्या ट्विटर अकाऊंटवरून जे ट्विट केले होते ते अमृता यांची व त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसंच त्यांचा ड्रग पेडलर्सची संपर्क होता हे दाखवण्याच्या दृष्टीने केले होते. यानंतर नवाब मलिकांनी संदर्भात प्रेस कॉन्फरन्सही घेतली. हे खोडसाळ आरोप असून फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी केले गेले आहेत."
यात पुढे म्हटलंय, "ज्या जयदीप राणा या व्यक्तीसोबतच्या फोटोवरून आमच्या अशीलाचे ड्रग्स पेडलरची संबंध आहेत असा आरोप केला आहे, तो फोटो चार वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या नदी संवर्धन कार्यक्रमाच्या वेळेचा आहे. राणा यांना या कार्यक्रमाच्या क्रिएटीव्ह टीमने नेमलं होतं. आमच्या अशील आणि त्यांच्या कुटुंबाचा या व्यक्तीशी काहीही संबंध नव्हता. त्या कार्यक्रमादरम्यान हा फोटो काढलेला आहे. त्या कार्यक्रमात अमृता यांनी गाणं म्हटलं होतं.
"ही गोष्ट 'रिव्हर मार्च' या संस्थेने आधीच स्पष्ट केली आहे. फक्त सोबत फोटो आहे म्हणून त्या व्यक्तीचा संबंध आहे असं नाही. तुम्ही राजकारणी आहात, अनेक लोकांमध्ये तुमची उठबस आहे, अनेक लोक तुमच्यासोबत फोटो काढत असतील याचा अर्थ तुमचा आणि त्यांचा संपर्क आहे असा होत नाही हे तुम्हालाही माहिती असेल. तरीही तुम्ही मुद्दाम हे फोटो शेअर केले."