मुंबईत झाला पहिला समलिंगी विवाह
सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीचे कलम 377 रद्द केल्यानंतर मुंबईतील पहिला समलिंगी विवाह सोहळा नुकताच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. रेनबो व्हॉइस या संस्थेचे संस्थापक विनोद फिलीप (43) आणि विन्सेंट (47) या दोघांनी लग्नगाठ बांधली.
विनोद फिलीप हा दक्षिण भारतातील असून त्याचा एका कट्टर ख्रिस्ती कुटुंबात जन्म झाला आहे. तर विन्सेंट हा मूळचा फ्रान्सचा असून दोघांची भेट पॅरिसमध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. सहा महिने डेटिंग केल्यावर आयुष्य सोबत घालवायचा निर्णय त्यांनी घेतला होता. विनोदने जेव्हा विन्सेंटबद्दल घरी सांगितले तेव्हा त्याला घरातून प्रचंड विरोध झाला होता. पण नंतर त्यांनी विन्सेंटला स्वीकारले. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समध्ये त्यांनी लग्न केले होते. त्यानंतर आता मुंबईतील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचे झाले.
यावेळी या दोघांचेही मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. विनोदने त्याच्या आयुष्यातील काही वर्षं मुंबईत व्यतीत केली होती. त्यामुळे दोघांनीही मुंबईत येऊन समलिंगींसाठी रेनबो व्हॉइस संस्थेच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली.