'त्याने' प्रोफाईल बदलले, मग स्वराज यांनी केली मदत
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फिलिपाईन्समध्ये राहणार्या एका काश्मीरी युवकाला ट्विटरवरील प्रोफाईल पाहून मदत करण्यास नकार दिला. या प्रकरणात सध्या फिलिपाईन्सची राजधानी मनीला येथे राहणार्या काश्मीरी तरुणाने सुषमा स्वराज यांना ट्विटरवरून मदत मागितली. परंतु, एमबीबीएस विद्यार्थी असणार्या शेख अतीक @SAteEQ019 च्या या अकाउंटवर सुषमांना आक्षेपार्ह मजकूर आढळला. त्यामुळे त्या भडकल्या आणि त्यांनी त्याला कोणतीही मदत करण्यास नकार दिला.
अतीकच्या ट्विटर प्रोफाईलवर 'भारत अधिकृत काश्मीरचा मुस्लिम असल्याचा गर्व आहे,' असे लिहलेले होते. यावर सुषमा यांनी उत्तर दिले की, "जर तुम्ही जम्मू काश्मीरमधील आहात, तर आम्ही तुम्हाला मदत करू. परंतु, आपल्या प्रोफाईलनुसार आपण भारत अधिकृत काश्मीरमधील आहात आणि अशी कोणतीही जागा नाही." सुषमा यांच्या या उत्तरानंतर शेख अतीक याने आपल्या प्रोफाईलमध्ये सुधारणा केली. यावर सुषमा यांनी ट्विट केले की, मी खूश आहे की, आपण आपल्या प्रोफाईलमध्ये सुधारणा केली आहे. त्यानंतर सुषमा यांनी फिलिपाईन्समधील भारताचे उच्चायुक्त जयदीप मुजुमदार यांना शेख अतीकला मदत करण्याचे निर्देश दिले.