शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

झाडाभोवती बांधून घेतले चार मजली घर

आतापर्यंत आपण अनेक प्रकारची घरे वा इमारती पाहिल्या असतील. बैठ्या चाळींपासून गगनचुंबी इमारतीपर्यंत विविध ठिकाणी लोक आपल्या ऐपतीप्रमाणे राहतात. मात्र कधी झाडावर बांधलेले घर कधी पाहिले आहे का? अशा घराची कल्पना चांगली वाटत असली तरी तूर्तात हे सगळे फक्त कार्टून मालिकांमध्येच पाहण्यास मिळते. परंतु एका व्यक्तीने खरोखरच झाडावर स्वतःचे स्वप्नातील घर साकारले आहे. ही व्यक्ती अन्य कुठली नसून राजस्थानच्या उदयपूर शहरातील आहे. के. पी. सिंह असे त्यांचे नाव असून आयआयटीची पदवी प्राप्त सिंह सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. मागील 18 वर्षांपासून ते या घरामध्ये राहत आहेत. त्यांचे घर छोटमोठे नाही तर आंब्याच्या झाडाभोवती चार मजली इमारत साकारली आहे. या घराची खासियत म्हणजे घर बांधतेवेळी झाडाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्याघराच्या खोल्यांतून झाड्या फांद्या बाहेर पडलेल्या पाहिल्या जाऊ शकतात. के. पी. सिंह यांनी 2000 मध्ये हे घर बांधले होते. तेव्हापासून ते या घरात राहतात. या घरात वर चढून जाण्यासाठी जिना, राहण्यासाठी खोल्या, स्वयंपाकासाठी किचन आणि अंघोळीसाठी बाथरूम आदी सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. आंब्याचे हे झाड 87 वर्षांपूर्वीचे आहे. निसर्गावरील प्रेमापोटी त्यांनी ज्या पद्धतीने घराची निर्मिती केली आहे व तेही झाडांना कोणतीही हानी न पोहोचविता, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच त्याचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल झाले आहे.