शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2024 (18:51 IST)

लोकसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान मोदी श्रीकृष्णासारखे सारथी,धैर्यशील मानेंचं विधान

dhiryashil mane
कोल्हापूरमधील तपोवन मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. हातकंणगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सदर सभा पार पडली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते.  या सभेबाबत बोलताना धैर्यशील माने यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. तर मोदी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आमचे सारथ्य करत आहेत, असे सांगितले.
 
धैर्यशील माने म्हणाले की, आजवर ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या, त्या ठिकाणाचे वातावरण बदलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा प्रचार करत असतील तर त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच याचा परिणाम महाराष्ट्रातील इतर जागांवरही दिसेल. 
 
ते पुढे म्हणाले, “रथाचं सारथ्य कोण करतो, याला खूप महत्त्व असतं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा स्वतःहून सारथ्य स्वीकारतात. तेव्हा अर्जुनाच्या हातात केवळ धनुष्यबाण उरतो आणि दिशा देण्याचं काम श्रीकृष्ण करतात. आज आम्ही रथावर धनुष्यबाण घेऊन उभा राहिलो आहोत. तर आमचे सारथ्य करण्यासाठी श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे.”असे वक्तव्य धैर्यशील माने यांनी केले.
 
 
Edited By- Priya Dixit