बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (13:43 IST)

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा : ठाकरे गटा विरोधात शिंदेगट लढणार की भाजपा याकडे सर्वांचं लक्ष

"हामी इंदिरामायनं दिलेल्या घरात अजुनबी ऱ्हातावं, म्हणून हातावरच शिक्का मारून घरी येताव," धाराशिव लोकसभा मतदारसंघातील एका वयोवृद्ध महिलेचे अस्सल गावरान भाषेतले हे उद्गार.
 
उर्वरित मतदारसंघांच्या तुलनेत फारशी चर्चा न होणाऱ्या धाराशिव मतदारसंघात राहणाऱ्या मतदारांचं एकेकाळी काँग्रेसवर असणारं प्रेम दाखवून देण्यासाठी पुरेसे आहेत.
 
कदाचित यामुळेच इथल्या मतदारांनी या पक्षाच्या अरविंद कांबळे यांना त्यांचं मतदारसंघात गाव नसतानाही चारवेळा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं. आता मात्र या स्थितीत भरपूर बदल झालेला दिसून येतो.
1996 ला काँग्रेसच्या या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने केलं. त्यानंतर इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पीछेहाट होत गेली.
 
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी उस्मानाबाद लोकसभेवर ताबा मिळवला आणि सुमारे 25 वर्ष काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना लोकसभेच्या गादीपासून दूरच ठेवलं.
 
हा मतदारसंघ काही अविस्मरणीय राजकीय लढतींचा साक्षीदार राहिला आहे. धाराशिवने मोठमोठे राजकीय नेते घडवले आहेत, राज्यपातळीवरच्या मातब्बर नेत्यांचे नातलगही या मतदारसंघात आहेत. पण...
 
हे सगळं असलं तरी हा जिल्हा विकास, रोजगार, शिक्षण आणि उद्योगापासून वंचितच राहिलाय.
 
याला सततचा दुष्काळ, राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, सरकारचं उदासीन धोरण अशी कारणं वरकरणी दिसत असली तरी याचं मूळ मात्र या मतदारसंघातील गरिबी, काही मोजक्या घराण्यांचं जिल्ह्यातील राजकारण आणि उद्योगावर असलेलं नियंत्रण यामध्ये आहे.
 
धाराशिव लेणी, तुळजापूर, तेर, नळदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांच्या अंगाखांद्यांवर उभा राहिलेला हा जिल्हा आणि या जिल्ह्याच्या राजकारणाचा हा आढावा.
 
उस्मानाबाद मतदारसंघाचा इतिहास कसा राहिला आहे?
 
धाराशिवच्या मतदारांनी 1952 ते 1991 याकाळात झालेल्या नऊ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं.
 
याकाळात राघवेंद्र दिवाण, व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर, तुळशीराम पाटील, टी.एस. श्रंगारे, टी.एन. सावंत, अरविंद कांबळे यांनी उस्मानाबादचं नेतृत्व केलं.
 
यापैकी अरविंद कांबळे हे तर मूळचे लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे रहिवासी होते. 1984 ला ते पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर झालेल्या तीन लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी विजय मिळवला.
 
1996 साली शिवसेनेचे शिवाजी कांबळे विजयी झाल्यानंतर मालिका खंडित झाली पण तरीही 1998 ला झालेल्या निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले. प्रत्येकवेळी निवडून आल्यानंतर अरविंद कांबळे लगेच उदगीर गाठायचे आणि थेट पुढच्या निवडणुकीतच उगवायचे अशी त्यांची ख्याती होती.
 
1984 ते 2009पर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी राखीव होता. या पंचवीस वर्षांमध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे, शिवसेनेचे शिवाजी कांबळे आणि कल्पना नरहिरे यांनी उस्मानाबादचं खासदार म्हणून नेतृत्व केलं.
 
2009 ला हा मतदारसंघ खुला झाला आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली.
 
त्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिलं. महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांनी त्या निवडणुकीत 6,787 मतांनी निसटता विजय मिळवला.
 
2014च्या निवडणुकीत मात्र रवींद्र गायकवाड यांनी या पराभवाची परतफेड करत पद्मसिंह पाटील यांचा 2,35,325 मतांनी पराभव केला.
 
त्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट पाहायला मिळाली होती आणि त्या लाटेवर स्वार होत रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
 
अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देणारी निवडणूक म्हणून 2014च्या निवडणुकीकडे पाहिलं गेलं.
 
2019मध्ये शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं आणि पद्मसिंह पाटील यांचे कौटुंबिक विरोधक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली.
 
राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी 1,27,566 मतांनी विजय मिळवला.
 
मागच्या पाच वर्षांमध्ये काय घडलं?
2019 ते 2024 या पाच वर्षांच्या काळात धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
 
2019पर्यंत धाराशिवच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव नसलेल्या भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या पक्षांमधून आयात केलेल्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या जोरावर अचानक मुसंडी मारली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातलग असणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजपने त्यांची ताकद वाढवली. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील तुळजापूरचे आमदार म्हणून निवडून आले.
 
धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
 
 
यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडे, उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि उस्मानाबाद विधानसभा ही उद्धव ठाकरे गटाकडे आहे.
 
बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता.
 
थोडक्यात महायुतीकडे सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलेल्या कैलास पाटील यांच्या रुपाने मविआचा एकच आमदार इथे आहे.
 
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मात्र ठाकरे गटातच राहिले आहेत.
 
आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रुपाने काँग्रेसच्या नेत्याला आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलं आहे.
 
उमेदवार कोण असणार आणि जागा कुणाला सुटणार? हेच फॅक्टर महत्त्वाचे
धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी केली तर ती खूप मोठी होईल.
 
पण मुळात प्रश्न असा आहे की 'अब की बार 400 पार'चा नारा दिलेल्या भाजपकडे ही जागा जाईल की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला इथे संधी दिली जाईल?
 
भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
 
भाजपकडे इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत असली तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत हेही लोकसभा निवडणुकांची तयारी करत असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
 
महायुतीतील तिसरा घटक पक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही धाराशिववर दावा सांगितला असल्याची चर्चा आहे. या पक्षाकडून जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं नाव पुढे केलं जातंय.
 
महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा एकीकडे रंगात आलेली असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे गटाकडून सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद आणि दुसरीकडे महायुतीने निवडणुकीसाठी केलेली जय्यत तयारी या दोन्हींमध्ये कोणता प्रचार प्रभावी ठरतो? हे महत्त्वाचं असणार आहे.
 
पाच वर्षे खासदार म्हणून काम केलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत सामान्य मतदारांना काय वाटतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकापेक्षा एक तगडे राजकीय नेते पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाणारा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी किती प्रभावी ठरतात यावरच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे.

Published By- Priya Dixit