1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (09:22 IST)

जळगावमधील भाजपाचा उमेदवार बदलण्याची दाट शक्यता

kamal 600
जळगाव :जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपाच्या तंबूत घबराट उडाली आहे. त्याबरोबरच जळगाव लोकसभेचे समीकरण झपाट्याने बदलण्याची चिन्हे दिसू लागल्याने खा.उन्मेष पाटलांचे बंडाला कसे सामोरे जायचे याबाबत भाजपाच्या श्रेष्ठींमध्ये मंथन सुरु झाल्याचे वृत्त आहे. भाजपाच्या गोटात यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाने उमेदवार बदलविला नाहीतर जळगाव लोकसभा मतदार संघात धक्का बसू शकतो, असा सूर पुढे येत आहे. त्यामुळे गुरुवारी ना.गिरीश महाजन यांनी माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यात बंदद्वार चर्चा झाल्याचे विश्‍वसनीय गोटातील वृत्त आहे.
 
यावेळी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी संधी दिली असली तरी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. मात्र, जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्याचा परिपाक विद्यमान खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती मशाल घेण्यात झाला. या घटनेने जिल्हा भाजपात भूकंप झाला असून संकटमोचक ना. गिरीश महाजन अडचणीत आल्याची चर्चा आहे.

स्मिता वाघ यांची उमेदवारी कायम राहिल्यास या मतदार संघात भाजपाला धक्का बसू शकतो, असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांच्याऐवजी करण पवार यांना कडवी झुंज देऊ शकेल, असा पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांचा चेहरा समोर आला आहे. त्यादृष्टीनेच गुरुवारी संकटमोचक ना. गिरीष महाजन व ए.टी.नाना पाटील यांच्यात दुपारी बंदद्वार चर्चा झाल्याचे वृत आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor