शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (12:56 IST)

परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट, बाहुबली प्रभास ने शेअर केला सरसेनापती हंबीररावचा टीझर

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता बाहुबली फेम प्रभासने 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. भव्य ऐतिहासिक सेट, तडफदार संवाद आणि लक्षवेधी अॅक्शन सिक्वेन्स असलेल्या अभिनेता प्रविण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हीने देखील या सिनेमाचा टीझर शेअर केले असून प्रवीण तरडे आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
'स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्या सारखंय, ते कायम धगधगतंच राहायला पाहिजे', अशा दमदार संवादाने 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या लेखणीतून हा चित्रपट उभा राहिला आहे आणि त्यांनी यामध्ये हंबीररावांची भूमिका साकारली आहे. अत्यंत भव्य आणि बिग बजेट असलेल्या या चित्रपटाचाच्या टीझरला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 
 
मराठीत कधी दिसलं नाही असं भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असे तरडे म्हणाले होते. टीझर पाहून याची खात्री पटते. यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा यात दाखवण्यात येत आहे. नुकताच लाँच झालेल्या या टीझरला 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
 
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. तसेच सरसेनापती हंबीरराव यांची मुख्य भूमिकाही अभिनेते प्रविण तरडे साकारणार आहेत. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते.