शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र अर्थसंकल्प
Written By
Last Updated : सोमवार, 6 मार्च 2023 (11:17 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशन चौथा दिवस : मुनगंटीवार-आव्हाड भेटीने वेधलं लक्ष

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कापूस, कांद्यांचे दर, संजय राऊत हक्कभंग या मुद्द्यानंतर आज नेमका कोणता मुद्दा या अधिवेशनात गाजतो, याकडे आज सर्वांचं लक्ष असणार आहे.
 
गुरुवारी (2 मार्च) सकाळी अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी आमदारांची गर्दी जमू लागली असता एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
 
मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर भेट झाली. यावेळी दोघांनीही स्मितहास्य करून हस्तांदोलन केलं.
 
गेल्या तिन्ही दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमार्फत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या दरम्यान या मुनगंटीवार आणि आव्हाड यांच्या भेटीमुळे वातावरण हलकंफुलकं बनल्याचं दिसून आलं.
 
मुनगंटीवार-आव्हाड यांच्या हस्तांदोलनाचे फोटो काढण्याची संधी माध्यमांनी सोडली नाही.
 
बुधवारी (1 मार्च) शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा होणार होती. कापूस, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याचा मुद्दा याआधीच चर्चेत आला होता. आमदारांनी कांद्याची तोरणं, कापसाच्या टोप्या - हार घालून कॅमेऱ्यासमोर बोलून झालं होतं.
 
अजितदादांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राजकीय टीका-टिप्पणी, हास्यविनोद करून झालं होतं.
 
बुधवारी सरकारचा दिवस होता. अजित पवारांचं भाषण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात सभागृहात बसून ऐकलं नसलं तरी अजित पवारांच्या ‘अंकलपासून ते फुटक्या काचांवरच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती’पर्यंत सगळ्यावर उत्तर मिळेल असं वाटतं होतं.
 
तितक्यात कोल्हापूरमध्ये संजय राऊत यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतलं ‘विधीमंडळ हे चोरमंडळ’ विधान चर्चेत आलं.
 
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत पायऱ्यांवर घोषणा सुरू होत्या. बेल वाजली...विधानसभेत सर्व आमदार दाखल झाले.
 
मागच्या अधिवेशनातील निलंबनानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच भाषण करणार होते. विधानसभा सुरू झाली.
 
दिवस तिसरा : संजय राऊतांच्या हक्कभंगाची मागणी
विरोधी पक्षनेते अजित पवार स्थगन प्रस्तावाबाबत काहीतरी बोलतील असं वाटत असताना आशिष शेलार बोलायला उभे राहिले.
 
“संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला आहे. एका खासदारांनी हे वक्तव्य करणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह आहे. यावर कारवाई झाली पाहिजे.”
 
त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना अध्यक्षांनी बोलायची परवानगी दिली. भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर विधीमंडळाचा अपमान केल्यासंदर्भात हक्कभंग आणण्याची सूचना केली.
 
‘विधीमंडळाला चोर मंडळ म्हणणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे,’ असं अतुल भातखळकर ओरडून सांगत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पंचायत झाली होती. सर्वजण एकमेकांकडे बघत होते.
 
अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा होता?
अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील अपयशावरून सत्ताधारी पक्षावर टीका करत होते.
 
शिंदे फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने उलटले. तरीही त्यांना राज्यात ठोस कामं करता आली नाहीत, त्यामुळे सुशिक्षित लोकांनी शिंदे फडणवीस सरकारला चपराक लगावली, अशी टीका अजित पवारांनी केली.
 
अजित पवार बोलत असताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना मिश्किल टोला लगावत पवार म्हणाले, “गिरीशजी एक मिनिट, आता माझं भाषण सुरू आहे ना, अंकल...अंकल, काकींना सांगेन हा.”
 
यानंतर सभागृहात हशा पिकला.
 
पहिला दिवस : कांद्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला.
 
तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठीशी ठाम असल्याचं नमूद केलं.
 
तसेच, सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
 
विरोधकांनी कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन केलं.
 
यावेळी विरोधी पक्षाचे आमदार डोक्यावर कांद्याच्या पाट्या घेऊन भवनात दाखल झाले. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
 
3-4 रुपये किलो दराने शेतकऱ्यांचा कांदा खपत असेल, तर शेतकऱ्यांनी काय करावं. या सरकारला कांद्याचा हार घालायला आम्ही आलोय. लाखो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे.