भावली धरण
मुंबई-आग्रा महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. डोंगरांच्या मधोमध जलाशय असल्याने त्याचे सौंदर्य काही वेगळेच दिसते. जलाशयातील निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूस असणारा धबधबा क्षणात मोहून टाकतो… आणि इथूनच निसर्ग भ्रमंतीला खरी सुरुवात होते. रस्त्यावर थांबून छायाचित्र घेण्याचा मोह प्रत्येकाला होतो.
डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनाने पुढे जाताना पिवळी, जांभळी, केशरी रानफुले आपल्या स्वागतासाठी दुतर्फा जणू उभी असतात. काही ठिकाणी रानफुलांची पिवळीशार चादर डोंगराने पांघरलेली दिसते. निसर्गातील रंगोत्सव इथे पाहायला मिळतो. सभोवतीचा हिरवगार निसर्ग, दाट झाडी आणि डोंगरांमधून वाहणारे झरे पाहिल्यावर बाहेरचे विश्व क्षणभर विसरायला होते.
नितळ पाण्याचे प्रवाह पाहिल्यावर आपल्यातले लहान मुल जागे होते आणि मनसोक्त डुंबावेसे वाटते. कपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य टिपण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यात तर हा निसर्ग वेडावणारा असतो. काही धबधब्यांकडे डोंगरावरील अरुंद वाटेवरून जावे लागते. याठिकाणी थोडी काळजी घेतलेली बरी. मात्र एकदा का खाली उतरून धबधब्याजवळ गेले की सभोवती दाट झाडी आणि समोर कोसळणारा धबधबा असा दुहेरी आंनद लुटता येतो.
कुरुंगवाडीपर्यंतचा हा संपूर्ण सात किलोमीटरचा रस्ता पर्यटनाचा सुंदर अनुभव देतो. येथून भंडारदरा 37 किलोमीटर आणि टाकेद 25 किलोमीटर अंतरावर आहे. पडत्या पावसात तर डोंगरावरून कोसळणाऱ्या अनेक धबधब्यांचे दर्शन या भागात होते. पर्यटकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता असलेले निवास न्याहरी केंद्रदेखील येथे आहे.
निसर्गाचे प्रत्येक रुप आनंद देणारे आहे. त्याच्या सान्निध्यात एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो. निसर्गासोबतचे हे क्षण सुखावणारे आणि तेवढेच आठवणीत राहणारे असतात. त्याचा अनुभव घेण्यासाठी अशा ठिकाणी जरूर जावे. तुम्ही निश्चित म्हणाल….. खरंच ‘भावली’!
कसे जाल - वाहनाने मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीपासून 5 किलेामीटर. रेल्वेने इगतपुरीला येऊन रिक्शा किंवा टॅक्सीने भावलीपर्यंत जाता येते. कसारा रेल्वेस्थानकापासून भावली साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे.