मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (18:24 IST)

निसर्गरम्य पवित्र तीर्थस्थान हरिहरेश्वर

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर ही जुळी गावे पर्यटकांत अतिशय लोकप्रिय आहेत.दोन दिवसाचा वेळ काढून इथे सहल आरामात होऊ शकते.म्हणून वर्षभर इथे पर्यटकांची वर्दळ असते.राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील इथे पर्यटकांचा ओघ सतत येत असतो.
 
 हरिहरेश्वरला मुंबई-गोवा रस्त्यावरील दासगावपासून फाटा फुटतो, तर श्रीवर्धनचा रस्ता माणगाव येथे सुरू होतो. श्रीवर्धनवरूनही होडीने हरिहरेश्वरला जाता येते. माणगाव कोकण रेल्वेवरही येते. तेथून देखील हरिहरेश्वरला जाता येते.
 
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा.डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे.हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत
 
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते.या मुळे ह्याला देवघर किंवा देवांचे निवास स्थान असे ही म्हणतात.हर‍िहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे.
 
श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे.येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देऊळ देखील महत्वाची स्थाने आहेत.हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. याची एक आख्यायिका अशी आहे, की बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले.
 
दिर 16 व्या शतकातले असून आत ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच पार्वतीचीही मूर्ती आहे. आवारात काळभैरवाचे मंदिर आहे. 
 
या मंदिरातून खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवरून गेले की थेट समुद्रात जाता येते. मंदिर असलेल्या टेकडीभोवती ओहोटीच्या वेळी गेले तर समुद्राच्या काठाने मोठी प्रदक्षिणा घालता येते. मात्र येथे लाटा अति जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळल्यासारखा होतो. त्यामुळे स्थानिकांचा सल्ला घेऊनच ही प्रदक्षिणा करणे सोयीचे ठरते. हरिहरेश्वरचा समुद्र किनारा छोटा आहे पण फार सुंदर आहे.
 
हरिहरेश्वरमध्ये राहण्या जेवण्याची उत्तम सोय आहे. येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे. तेथे पर्यटकांना सर्व सोयी मिळू शकतील. शिवाय खासगी हॉटेलही बरीच आहेत. शिवाय घरगुती रहाण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते. त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो याचाही अनुभव एकदा तरी घेता येऊ शकतो.
 
हे क्षेत्र मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर आणि पुण्याहून जवळपास 180 किलोमीटरवर आहे. येथे पोहोचण्यासाठी एस.टी. बस किंवा खासगी वाहनाने जाऊ शकतो. पुण्याहून जाण्याचे 3 मार्ग आहेत. मिळशी, भोरवरुन महाड मार्गे, वाई वरुन महाबळेश्वर मार्गे,जाता येते.