शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (16:06 IST)

Jyotiba Devasthan ज्योतिबा मंदिर कोल्हापूर

कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते.
 
ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.
 
कथा
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.
मंदिर
देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्‍या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. 
 
या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. 
 
कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.
 
ज्योतिबाची मूर्ती 
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.
 
।। श्री जोतिबा आरती ।।
भगीरथी तूही हिमाचल वाशी । नलगत पलखल दुर्जन संहारी त्याशी ।
तो हा हिम केदार करवीरा पाशी । रत्नागिरीवर शोभे कैवल्य राशी ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदार । दासा संकटवारा भव भय निवारा ।।१।।
 
उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाम पावला ।
रत्नासूर मर्दूनी भक्ता पावला । दास म्हणे थोर भाग्या लाभला ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदार । दासा संकटवारा भव भय निवारा ।।२।।