रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (10:21 IST)

नवरात्र विशेष :सोलापूर करमाळा ची कमळा देवी माहिती

सोलापूर जिल्ह्यातला करमाळा. भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. याच करमाळा गावामध्ये आहे श्री कमळा देवीचे मंदिर. या देवीच्या मंदिरामुळे करमाळा शहर प्रसिध्द झाले .श्री राव राजे निंबाळकर यांनी 1727 मध्ये श्री कमळा भवानीचे मंदिर बांधले.या मंदिराला तुळजापुरातील तुळजा भवानीचे दुसरे पीठ म्हणतात.हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे.या मंदिराचे प्रवेश द्वार दक्षिण पूर्व आणि उत्तरदिशेला आहे. या मंदिराची आखणी 80 एकर परिसरात केली असून देवी आईचे मंदिर पूर्वाभिमुख असून काळ्या पाषाणातील घडीव दगडात आहे.या मंदिराला एकूण पाच दार आहे.दारावर गोपुरे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आईभवानी. रंभाजी निंबाळकर हे बरेच वर्ष तुळजापूर येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात.करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. .निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.
 
संपूर्ण मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, आणि गर्भगृहातील कमळाभवानी आईची मूर्ती गंडकी शिळेतील  पाच फुटी उंच अष्टभुजा आणि विविध आयुधे धारण करणारी महिषमर्दिनीची आहे देवीच्या मूर्तीच्या वरील बाजूस उंच शिखर सहा स्तरीय असून त्यावर विविध देवी देवतांची शिल्पे कोरलेली आहे.ह्या मंदिरात 96 ह्या संख्येला विशेष महत्व आहे
 
हे मंदिर 96 खांबावर उभारलेले असून मंदिरात जाण्यासाठी एकूण 96 पायऱ्या आहे. मंदिरातील छतावर 96 चित्र रेखाटले आहेत.
कमलाभवानी मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसते. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमळा भवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. 
कमळाभवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली कमळा भवानीमाता अष्टभुजा आहे.

मंदिरात कमळा भवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभाऱ्यात श्री विष्णू-लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत 80 फुटी उंच दीपमाळ असून त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत.
 
देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. वार्षिक यात्रा कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थीच्या काळात साजरी केली जाते.दरवर्षी कमळादेवीची मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते. या काळात रोज देवीचा छबिना निघतो, परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्टय़पूर्ण असतो. रात्री 12 वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी, मानकरी मोठी गर्दी करतात. ‘
 
तुळजाभवानी प्रमाणे येथेही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत. 
अतिशय सुंदर असे हे मंदिर आणि करमाळा तालुक्याचा परिसर सैराट चित्रपटामध्ये झालेल्या चित्रिकरणामुळे प्रसिद्धीस आला आहे.
 
कसे जायचे -
 
विमानाने- येथून जवळचे विमान तळ पुणे आहे तेथून बस ने जाता येते.
 
रेल्वेने - जवळचे रेल्वे स्थानक जेऊर,मध्य रेल्वेच्या पुणे-सोलापूर मार्गावर आहे.जेऊर पासून करमाळा 11 किमी अंतरावर आहे.
 
रस्ते मार्गे- सोलापूर पासूनचे अंतर 135 किमी पुण्यापासून 200 किमी अंतरावर आहे आणि अहमदनगर पासून 90 किमी अंतरावर असून स्वतःच्या  वाहनाने आणि बस ने जाऊ शकता.