मांढरदेवची काळूबाई माहिती मराठी : मांढरदेवी काळूबाई
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे-साताऱ्या जिल्हा तसेच वाई भोर-खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे. मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे. या पर्वताला मांढरगड असे म्हणतात. येथे साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहुन भोरमार्गे जाऊ शकतो.तसेच शिरवळ वरून लोहोम झगळवाडीतून पाऊलवाट आहे.तेथून देखील येथे जाऊ शकतो. येथे मध्ये म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे. याचा बाजूस मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर देखील आहे. तिथे तिला मंडी आई असे म्हणतात. या समोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे.
हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे.सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडी वर हे मंदिर आहे. ते सातार्यातून 20 कि.मी. अंतरावर मांढरदेवी काळुबाई चे मंदिर आहे .मंदिर लहान असुन त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत.तसेच मुख्य मंदिरासमोरिल डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठान आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहे.
मांढरच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे.देवीआईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे.मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतातया देवीचे वाहन सिंह आहे.
देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला. त्याप्रित्यर्थ पौष पौर्णिमेला देवीआईची मोठी यात्रा भरते.या काळात लाखो भाविक देवीआईचे देव्हारे घेऊन मांढरगडावर येतात. देवीआईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीआईच्या मुखवट्याला पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात.हा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.
या संदर्भात आख्यायिका आहे की सत युगात मांढव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांढव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वतीने त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली.लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये या साठी त्याचे रक्तप्राशन केले.अशा प्रकारे देवीआईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांढरगड डोंगरावर चढून गेली नंतर भाविकांसाठी इथेच स्थानापन्न झाली.