1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 21 मे 2025 (07:30 IST)

Saint Ziparu Anna Maharaj संत झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिर

Sant Ziparu Anna Maharaj
Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीमध्ये अनेक संतमंडळी होऊन गेलीत ज्यांनी समाजाला भक्तिमार्ग शिकवला. योग्य मार्गदर्शन केले. परमार्थ आणि अध्यात्म याचे ज्ञान दिले. महाराष्ट्रात असेच एक संत होते. ज्यांनी अनेकांचा उद्धार केला. ते संत म्हणजे परम पूज्य झिपरू अण्णा महाराज होय. 
 
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावामध्ये वाकी नदीच्या तीरावर संत झिपरू अण्णा महाराजांचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे . या मंदिरात गुरुवारी महाप्रसाद वाटला जातो. अनेक भाविक दुरदुरून महाराजांच्या दर्शनाला येतात. महाराज नेहमी भक्तांच्या हाकेला धावून जातात. 
संत झिपरू अण्णा महाराज यांचा जन्म १७७८ मध्ये आई सावित्री आणि वडील  मिठाराम यांच्या पोटी साळी समाजात झाला. महाराजांना लहानपणीच श्री कल्याणदास महाराज यांचा अनुग्रह झाला. महाराजांनी या सांसारिक जीवनाचा त्याग केला होता.व त्यांनी दिगंबर अवस्था स्वीकारली. ते नेहमी नग्नावस्थेतच फिरायचे. त्यांना दैवी शक्ती प्राप्त होती. त्यांनी बोललेला शब्दशब्द खरा ठरायचा. तसेच संत झिपरू अण्णा महाराजांनी १९४९ मध्ये वैशाख वद्य नवमीस नशिराबाद येथे त्यांचे भक्त श्री भय्याजी  कुलकर्णी यांच्या घरी समाधी घेतली. 
 
नशिराबाद मध्ये असलेले अण्णांचे समाधी मंदिरास तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. अण्णांचे समाधी मंदिर हे वाकी नदीच्या तिरावर आहे. मंदिराच्या प्रांगणात भला मोठा वृक्ष आहे. तसेच आत मध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, दत्तगुरु मंदिर, शनी मंदिर आणि मारुतीचे मंदिर आहे. मंदिरात भव्य सभा मंडप आहे. दरवर्षी येथे सर्व सण मोठ्या उत्सहात साजरे केले जातात. आण्णा महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी तिथीप्रमाणे वैशाख वद्य नवमीला साजरी केली जाते. महाराजांचा  पुण्यतिथी सोहळा मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. भक्त व गावातील मंडळी श्रींच्या पादुकांची पुजा, महाअभिषेक करतात. तसेच पारायण व अन्नदान यांचे देखील आयोजन केले जाते. तसेच महाराजांच्या या भव्य दिव्य या उत्सवात परदेशी नागरिकसुद्धा सहभागी होतात. अण्णा महाराजांची ख्याती परदेशातही असून त्यांचा भक्तपरिवार खूप मोठा आहे. तुम्ही देखील परम पूज्य संत झिपरू अण्णा महाराजांच्या समाधी मंदिराला नक्की भेट द्या. 
संत झिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद जावे कसे?
जळगाव जिल्हा अनेक प्रमुख शहरांना रस्ता मार्गाने आणि रेल्वे मार्गाने जोडलेला आहे. जळगाव शहरात आल्यानंतर तुम्ही रिक्षा किंवा बसच्या मदतीने नशिराबाद गावात नक्कीच पोहचू शकतात. नशिराबाद बस स्टॅन्ड वर उतरल्या नंतर काही मिनिटातच महाराजांच्या मंदिरात पोहचता येते. 
Edited By- Dhanashri Naik