बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (21:27 IST)

Tadoba National Park ताडोबा राष्ट्रीय उद्यान

tadoba forest
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. याची स्थापना 1955 साली झाली. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणार्‍या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. 
 
अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात 50 वाघ आहेत. त्याबरोबर बिबट्या, अस्वल, जंगली कुत्री अथवा कोळसून, तरस, उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी, नीलगाय, सांबर, चितळ, भेकर, कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते. इथे जवळजवळ 181 जातींचे पक्षी पाहता येतात. 
 
ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.
 
कसे जायचे
जवळीक विमानतळ नागपूर असून येथून ताडोबा 140 कि.मी. अंतरावर आहे. चंद्रपूर हे मुख्य मार्गावरील रेल्वे स्टेशन असून येथून बस किंवा खाजगी गाडी हायर करून सहज जाता येते. ताडोबा चंद्रपूरहून 45 कि.मी अंतरावर आहे.