मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (10:07 IST)

धनंजय मुंडे भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार व राज्याच्या महिला - बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आपण धिक्कार करतो. निवडणुकीतील पराभवाच्या भितीने टीका करताना धनंजय मुंडे यांनी किमान मर्यादा पाळायला हवी होती आणि भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. या धक्कादायक वक्तव्याबद्दल धनंजय मुंडे यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
 
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महिला आणि बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या समाजहिताच्या कामामुळे त्यांना असलेला जनतेचा पाठिंबा आणखी वाढला आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे तेथे जनता त्यांच्या पाठीशी आहे. अशा स्थितीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याकडून आपला पुन्हा एकदा पराभव होणार, असे ध्यानात आल्यामुळे धनंजय मुंडे हताश झाले. त्यांची निराशा समजू शकते. पण त्यामुळे त्यांनी प्रचारात पातळी सोडून असे अश्लाघ्य वक्तव्य करणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी राजकीय स्वार्थासाठी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्व सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. आपण त्यांच्या विधानाचा धिक्कार करतो.
 
मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी पराभूत केले होते. या विधानसभा निवडणुकीत आपला पुन्हा एकदा पराभव होणार याची जाणीव झाल्यामुळे धनंजय मुंडे यांचा तोल गेला आणि त्यांनी आपल्या बहिणीविषयी अत्यंत धक्कादायक टिप्पणी केली. त्यांचे हे विधान राजकीयदृष्ट्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहेच व त्यासोबत बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारे आहे.
 
ते म्हणाले की, महिला सक्षमीकरणाचा ढोल पिटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा या घटनेत उघड झाला आहे. या सर्व प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मौन आश्चर्यकारक आहे. शरद पवार यांनी निवडणूक प्रचारात अश्लील हातवारे केल्यानंतर त्यांच्या नेत्याने महिलांचा अपमान करणारे हे धक्कादायक वक्तव्य केले आहे.