1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकरसंक्रांती आणि सुंदर हलव्‍याचे दागिने

sankranti decoration idea
काळ किती ही आधुनिक असो पण काही परंपरा अजूनही जपल्या जात आहे. किंबहुना सोशल मीडियामुळे त्याचे क्रेझ अजूनच वाढत आहे. अशात एका रितीनुसार मकर संक्राती या सणात नववधू किंवा लहान बाळाची पहिली संक्रांत म्हणून त्यांना हलव्याचे दागिने घालून संक्रात साजरी करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजरी होत आहे. संक्रातीच्या निमित्ताने घरात आलेल्या सुनेचं आणि जावयाचं किंवा नवजात बाळाचे कोडकौतुक म्हणून त्यांना हलव्याचे दागिने घालून हा सण थाटामाटात साजरा केला जातो.
 
नवविवाहित आणि लहान मुलांसाठी या सणाचे विशेष महत्तव आहे. लग्नानंतर पहिल्या संक्रातीला नव‍विवाहितेला तसेच बाळाला काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केले जाते. हलव्याचे दागिने घातले जातात. 
आता काहींना जर प्रश्न पडत असेल की हलव्याचे दागिने म्हणजे काय ? तर येथे आम्ही विस्तारपूर्ण सांगत आहोत की यात नववधूसाठी बांगड्या, कानातले, बाजूबंद, मांगटीका, हार, अंगठी, मंगळसूत्र, कंबरपट्टा तयार केला जातो तर नवर्‍यासाठी घडी, हार, अंगठी, ब्रेसलेट असे अलंकार तयार केले जातात. पण आता याशिवाय देखील हे दागिने खूप डिझाइन्समध्ये उपलब्ध होतात. नवीन डिझाइन्समध्ये हलव्याचे नक्षीदार नेकलेस, पाटल्या मेखला, श्रीफळ, मुकुट, मोहनमाळ, लोंबते कानातले, चिंचपेटी, बोरमाळ, नथ, गजरा, पैंजण देखील पाहायला मिळतात. 
दागिन्यांचे वैशिष्टे म्‍हणजे ते विविध पदार्थांपासून बनविले जातात. यामध्ये खसखस, तीळ, शेंगदाणे, साबुदाणा, मुरमुरे, तांदूळ, वेलदोडे, साखर फुटाणे आदी पदार्थ कलात्मक पद्धतीने उपयोगात आणले जातात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत या दागिन्यांना मागणी असते. अलीकडे मोबाईल, पेन, टाय पिन देखील दागिन्यांमध्ये सामील झाले आहे.
 
तसेच हौशी लोक विविध प्रकारे रुखवत तयार करुन सजवतात. त्यात या सीझनमध्ये येणार्‍या भाज्या, बोर, बूट, ऊस, मटार, यांचा वापर केला जातो. गुळ आणि तिळाचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारे सजावट केली जाते. काळ कपडे, हलव्याचे दागिने, सौभाग्याच्या वस्तू ठेवल्या जातात.
सुवासिनींना बोलावून हळदीकुंकू समारंभ केला जातो. तिळगुळ, हलवा, वाण दिलं जातं.