शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने करावयाची कामे
महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या टप्प्यामध्ये राज्यातील सुमारे ३ लाख ५१ हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी (eKYC) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
विभागनिहाय लाभार्थी संख्या (तिसरी यादी)
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या तिसऱ्या यादीतील विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
छत्रपती संभाजीनगर : २,०६,४५०
अमरावती : ८५,०७६
नागपूर : ३०,७३८
नाशिक : १४,२४४
पुणे : ११,९२८
कोकण : २,७५६
पात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना
१. यादी कुठे पाहाल?
तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची जिल्हा निहाय नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (व्ही.के.एस.एस.) आणि ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
२. कर्जमाफीचे स्वरूप:
या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या स्थितीनुसार गृहीत धरण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर आकारण्यात आलेला खर्च पूर्णपणे माफ केला जाईल. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्या बाबतीत शासनाच्या 'हेअर कट' धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक (शून्य) करण्यात येणार आहेत.
३. तात्काळ करावयाचे काम – आधार प्रमाणीकरण (eKYC):
पात्र शेतकऱ्यांनी आपल्या ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीच्या रक्कमेची खातरजमा करून तात्काळ जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' (CSC Center) जाऊन आधार प्रमाणीकरण (eKYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम खात्यावर वर्ग केली जाणार नाही.
४. विशेष प्रकरणांसाठी SOP लागू:
या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, किंवा जे वयोवृद्ध आहेत व ज्यांच्या बोटांचे ठसे (biometrics) मॅच होत नाहीत, अशा लाभार्थ्यांना अडचणींशिवाय लाभ देण्यासाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.
सहकार मंत्र्यांचे आवाहन:
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही विलंबाशिवाय ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

