गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

इंग्रजी वर्षाखेरीस भक्तिरसात चिंब झाले श्री मंगळग्रह मंदिरातील भाविक

अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिर आगळेवेगळे लोककल्याणकारी उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यासाठीही ख्यातनाम आहे. या पार्श्वभूमीवर इंग्रजी वर्षाखेरीस सर्वत्र होणाऱ्या पाश्चिमात्त्यांच्या अंधानुकरणास छेद देण्याचा उपक्रम ३१ डिसेंबर रोजी मंगळग्रह सेवा संस्थेने राबविला.
 
सायंकाळपासून मंदिरात सुंदरकांड व भजन आणि कीर्तने सुरू होती. इतरत्र डीजेचा कर्णकर्कश आवाज व रुचिहीन धांगडधिंगा असलेल्या गीतांवर लाखो लोक बेभान होऊन नशेत चूर होऊन वाटेल तसे वाकडे- तिकडे नृत्य करीत होते. त्याचवेळी मंदिरात भक्तिरसात चिंब होऊन अनेक स्त्री-पुरुष उत्तम पदलालित्यासह फेर धरून नृत्य करीत होते. टाळ्यांच्या गजरात एकमेकांना प्रोत्साहन देत होते. फुगड्या खेळत होते. अनेक ठिकाणी ३१ डिसेंबर रोजी सर्रास मद्यपान सुरू असताना मंदिरात मात्र भाविक  मसालेदार दुग्धपानाचा पारंपरिक आनंद लुटत होते. सोशल मीडियावरील एका छोटेखानी आवाहनानंतरही मंदिरात स्थानिकच नव्हे, तर परगावच्याही अनेक भाविक स्त्री-पुरुषानी अलोट गर्दी केली होती.
 
सामाजिक कार्यकर्ते निलेश महाजन हे सपत्नीक श्री हनुमान महापूजेचे मानकरी होते. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी यांनी सुंदरकांड म्हटले. त्यांना सारंग पाठक, शुभम वैष्णव, वैभव जोशी (पाचोरा), दिवेश जोशी (धुळे) यांनी साथ दिली. तसेच शहरातील जुना जाणता व नामवंत म्युझिकल ग्रुपच्या किशोर देशपांडे यांनी हार्मोनियम, देवांशू गुरव यांनी ढोलक, तर गंगाधर कढरे यांनी ऑक्टोपॅडच्या साथसंगतीने अनेक भक्तिगीते, भजन, कीर्तन सादर केले. यावेळी विशेष सजावट करण्यात आली होती.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त जयश्री साबे, सेवेकरी आशिष चौधरी, उमाकांत हिरे, राहुल पाटील, आर. जे. पाटील, एम. जी. पाटील, जी.‌ एस. चौधरी आदींसह अनेक भाविक उपस्थित होते. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.