शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरातील पालखी मिरवणूक ठरली एकमेवाद्वितीय...

अमळनेर (जि. जळगाव, महाराष्ट्र)
पालखी म्हटले, की सर्वसाधारणपणे डोळ्यांसमोर उभी राहते ती आषाढी, कार्तिकी एकादशीनिमित्ताने महाराष्ट्रातील विविध मंदिरांकडून निघणाऱ्या दिंडीतील पालखी. याचवेळी शाळा महाविद्यालये, संस्था, देवालयांकडून ढोल, ताशा पथक यांच्या साथीने काढली जाणारी शोभायात्रा आणि त्यातील पालखी. खानदेशातील अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानातर्फे काढल्या जाणाऱ्या पालखीला सुमारे २०० वर्षांंचा इतिहास आहे. 
अलिकडे अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थांतर्गत श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दर मंगळवारी निघणारी पालखी मिरवणूक ही हजारो भाविकांचे आकर्षण ठरली आहे.
सायंकाळी पाचच्या सुमारास श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्री मंगळग्रह देवाची पालखी मिरवणूक काढली जाते. प्रारंभी मंदिरासमोर अतिशय आकर्षक रांगोळी काढलेल्या जागेत विविध फुलांनी सजविलेली पालखी ठेवली जाते. याचवेळी श्री मंगळग्रह देवाचा धरणी गर्भ सभूतं विद्युतकान्ती समप्रभम्, कुमारं शक्ती हस्तं चं मंगलम् प्रणमाम्यहम् हा मंत्रघोष पुरोहितांकडून केला जातो. सेवेक-यांच्या वाद्यवृंदाकडून जल्लोषपूर्ण वातावरणात ढोल-ताशांचा गजर केला जातो. त्यानंतर पुरोहितांकडून शंखनाद व मंत्रोच्चार करीत मंदिरातून श्री मंगळग्रह देवाची मूर्ती व पादुका पालखीत ठेवल्या जातात.
आकर्षक वेशभूषेतील भालदार, चोपदार, श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त मंदिरातील सेवेकरी व हजारो भाविक यांच्या साक्षीने यजमानांकडून पालखीतील श्री मंगळग्रह देवाच्या मूर्तीचे व पादुकांचे विधिवत मंत्रोच्चाराचा गजर करीत पूजन केले जाते. यजमानांनी पालखी खांद्यावर घेतल्यानंतर पालखीचे प्रस्थान होते. पालखी मार्गात राम, कृष्ण, श्री मंगळग्रह देवाची स्तुती करणारी विविध भक्तिगीते, भजन गायिली जातात. यावेळी भाविकांची असलेली उपस्थिती आणि पालखी मिरवणुकीतील भक्तिमय, चैतन्यमय वातावरण भाविकांमध्ये एकप्रकारची देवी ऊर्जा भरल्याचे जाणवते.
पालखी मिरवणूक मंगळेश्वर श्री स्वामी समर्थांच्या मंदिराजवळ आल्यावर श्री स्वामी समर्थांची स्तुती करणारी भक्तिगीते, भजन: गायिली जातात. त्यानंतर श्री स्वामी समर्थांची महाआरती केली जाते. तेथून पालखी मिरवणूक मंगळेश्वर महादेव मंदिराजवळ आल्यावर भगवान महादेवाची स्तुती करणारी विविध भक्तिगीते व भजन सादर केली जाऊन भगवान महादेवाची महाआरती केली जाते. श्री मंगळग्रह देवाच्या नामस्मरणाचा गजर करीत पालखी मिरवणूक पुढे सरसावते.

पालखी मिरवणूक श्री मंगळग्रह देवाच्या मंदिरासमोर आल्यानंतर काही वेळ थांबून तेथून श्री मंगळग्रह देवाप्रती 'बार बार वंदना, हजार बार वंदना' ही क्षमाप्रार्थना गात प्रदक्षिणा पूर्ण केली जाते, त्यानंतर पुनश्च यजमानांकडून विधिवत पूजा- अर्चा होऊन शंखनाद करीत पालखीतील श्री मंगळग्रह देवाची मूर्ती व पादुका मंदिरात पुनर्स्थापित केल्या जातात. त्यानंतर सायंकाळच्या नियमित महाआरतीला प्रारंभ होतो.