बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:52 IST)

संभाजीराजेंचं उपोषण मागे, ठाकरे सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या

sambhaji raje
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (28 फेब्रुवारी) उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं.
 
महाविकास आघाडी सरकारच्या शिष्ठमंडळाने आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
 
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलिप वळसे-पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
संभाजीराजे उपोषणास बसल्यानंतर विविध नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्यांचा सहभाग होता.
 
राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या?
एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची यादी यावेळी वाचून दाखवली. ते म्हणाले,
 
1. सारथीकडून महिन्याभरात कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्यात येतील. तसंच सारथीअंतर्गत अभ्यासक्रमांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कार्यक्रम 30 जून 2022 पर्यंत जाहीर करण्यात येईल.
 
2. सारथी संस्थेच्या 8 उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल.
 
3. सारथीमधील रिक्त पदं 15 मार्च 2022 पर्यंत भरण्याचा निर्णय झाला आहे.
 
4. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात 80 कोटी आणि उर्वरित 20 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अतिरिक्त निधी सुद्धा दिला जाईल.
 
5. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्यासाठी धोरण ठरवलं जाईल.
 
6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ आणि इतर मंडळांवर पूर्णवेळ संचालक नियुक्त करण्यात येतील.
 
7. पुनर्विचार याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अर्ज करण्यात येईल.
 
8. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी गृहमंत्रलायकडून पाठपुरावा केला जाईल येईल. व्हीडिओ फुटेजमध्ये ज्यांचा सहभाग नाही त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी निर्णय घेण्यात येईल.
 
9. मराठा आंदोलनात मृत पावलेल्या वारसदारांना आश्वासन दिलेल्या आणि प्रलंबित राहिलेल्या नोकऱ्या तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून दिल्या जातील.
 
राज्य सरकार एवढ्या तातडीने मागण्या पूर्ण करेल असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी दिली. यापुढे न्यायालयीन लढाईत राज्य सरकारला मी साथ देईन असंही ते म्हणाले.
 
'गरीबासाठी लढा'
उपोषणादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या साखरेचे प्रमाण कमी झाले होते आणि रक्तदाब कमी झाला होता, त्यांना अशक्तपणा जाणवत आहे, असं त्यांच्या ट्वीटरवरुन सांगण्यात आलं होतं. तसंच संभाजीराजेंना रुग्णालयात दाखल करण्यात यावे असाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
 
माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मला उपोषण करावं लागत आहे, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं.
 
मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे छत्रपती हे 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसले होते. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती.
 
शनिवारी सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून संभाजीराजे यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली. संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यासुद्धा यावेळी उपोषणात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.
 
संभाजीराजे उपोषणास बसल्यानंतर विविध नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्यांचा सहभाग होता.
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड तसंच माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील आदी नेत्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत काहीवेळ उपोषणास्थळी व्यासपीठावर उपस्थिती नोंदवली.
 
आमरण उपोषणाचा दिला होता इशारा
महाराष्ट्र सरकारनं मागण्या त्वरित मान्य न केल्यास 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 14 फेब्रुवारी रोजी दिला होता.
 
26 तारखेपासून पूर्णपणे अन्नत्याग करणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यावेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली.
 
मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ताय द्यायला काय हरकत आहे?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
 
संभाजीराजे यांच्या 14 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदतले मुद्दे
राज्य सरकारच्या काही मुद्द्यांच्या विरोधात मी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, असं संभाजीराजेंना जाहीर केलं आहे.
 
सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावं.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही, संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत.
वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत.
कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली, त्यावर पुढील कारवाई कधी होणार?
आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे.
राज्य सरकारनं वरील मुद्दे त्वरित सोडवले नाहीत, तर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार. पूर्णपणे अन्नत्याग करणार. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण करणार, असा इशारा यावेळी संभाजीराजेंनी दिला आहे.