बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (18:28 IST)

केवळ मराठा समाजाचे नेतृत्व न करता बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न : संभाजीराजे

नाशिक : आपण इथं आलात, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. नाशिकच्या पुण्यनगरीतून मी सांगू इच्छितो की, मी फक्त मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये. मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे. संपूर्ण बहुजन समाजच कसा एकत्र राहू शकतो, हा माझा दृष्टीकोन आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले. नाशिकमधील आंदोलनात उपस्थितांशी बोलताना संभाजीराजेंनी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.
 
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यू पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. या आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, तिथून केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत… असाच पर्याय असल्याचे संभाजीराजेंनी नाशिकमध्ये बोलताना म्हटले. तसेच, राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
 
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकामध्ये थोरात सभागृहाच्या प्रारंगणात छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन पुकारले आहे. सोमवारी सकाळी नऊपासून आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. या आंदोलनस्थळी विविध लोकप्रतिनिधी हजेरी लावत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, ११ वाजता भुजबळ यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आपली भूमिका स्पष्ट केली.
 
मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी वारंवार केली जात आहे. त्यांची मागणी रास्त असून आमचादेखील या मागणीला पुर्वीपासून पाठिंबा राहिलेला आहे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेनेसह सर्वांची हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या समाजालाही आरक्षणापासून वंचित ठेवता कामा नये.
 
यावेळी भूमिका स्पष्ट करताना राज्यात होत असलेल्या ओबीसी आंदोलनाची भूमिका देखील स्पष्ट केली. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
 
काहींचं म्हणणं आहे की ओबीसींचे जे आक्रोश मोर्चे सुरु झाले आहेत, ते मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असं नाही. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं आणि ओबीसींचं असलेलं आरक्षणावर गदा आणली. सर्वोच्च न्यायालयाने माहिती गोळा करण्यास सांगितली, पण कोरोनाच्या काळात कोण माहिती गोळा करणार? कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर अडचणी निर्माण होता. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमचं आरक्षण वाचवा. म्हणून त्यांचा आक्रोश मोर्चा आहे. पण काही जे लोक आहेत, ते मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही, असं भुजबळ म्हणाले.