शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (15:44 IST)

पंतप्रधान मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही : शाहू महाराज

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आज कोल्हापुरात मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मार्गदर्शन केलं. शाहू महाराज यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रावर रोख होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ते सकारात्मक असल्याचं या नेत्यांकडून समजतंय. परंतू, पंतप्रधान मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही, असं शाहू महाराज यांनी म्हटलं.
 
पंतप्रधान मोदींचे विचार काय आहेत, हे आपल्याला लक्षात आलेले नाही आहेत. त्यांच्याकडून भूमिका स्पष्ट झाली तर आपल्या आरक्षणाचा प्रश्न निश्चित सोडवता येईल. आपल्याकडे बहूमत नाही आहे. बहूमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्याच्याकडे जाऊन विनंती केली पाहिजे की तुम्ही आमच्याबरोबर या, आम्हाला मदत करा. मराठा समाजासाह देशातील इतर समाजांचा देखील विचार करा. केंद्राला ज्या काही दुरुस्त्या करायच्या असतील त्याचा पुन्हा एकदा विचार करा. केंद्राने जर सकारात्मक पाठिंबा दिला, तर दोन-तीन वर्षे पिटिशन करत बसण्यात अर्थ नाही आहे. थेट केंद्राकडे पोहोचा. तसं केलं तर मला खात्री आहे की हा प्रश्न नक्की सुटेल, असा विश्वास शाहू महाराज यांनी व्यक्त केला.