मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरू द्या : उदयनराजे
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरू द्या, अशी एक फेसबुक पोस्ट उदयनराजेंनी केली आहे.
उदयनराजे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारला थेट इशारा दिला आहे. उदयनराजे यांची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ अन्यायाविरुद्ध झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणाचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असे उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
''मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुण निराशेच्या गर्तेत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही, तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या.''