जरांगे-पाटील म्हणाले, तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू
मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केला.20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. अशातच मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. “पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली, तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्त वाहिनीशी संवाद साधत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू.”
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी म्हटलं, “पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, 50 किलो बाजरी पीठ, 50 किलो गव्हाचे पीठ, 50 किलो तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे. जेथे रस्त्यात थांबाल तेथेच स्वयंपाक करून खायचा आहे.”
Edited by -Ratnadeep Ranshoor