लीन होऊन त्यांची माफी मागतो : जरांगे
जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणादरम्यान त्यांना पाणी पिण्याचं आवाहन करण्यासाठी गेलेल्या ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांच्याशी बोलताना संतांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली. जरांगे पाटील यांच्या या टिपण्णीने संतापलेल्या बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेत जरांगेंवर घणाघाती आरोप केले. त्यानंतर जरांगे पाटलांनी माघार घेत संत तुकाराम महाराज यांची माफी मागितली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "माझ्या तोंडून चुकीचे शब्द गेले असतील तर मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांची माफी मागतो. माझ्या आयुष्यातील ही पहिली माफी आहे. मात्र मी तुकाराम महाराजांना मानतो. मी वापरलेले ते शब्द मागे घेतो," अशा शब्दांत जरांगे पाटलांनी आपली चूक मान्य केली.
सरकारवर हल्लाबोल
तुकाराम महाराजांची माफी मागत असताना मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारस्कर यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. "अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप आहे. तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाकीच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही. उपोषणाच्या काळात माझी चिडचिड होते. त्या चिडचिडीतून माझे काही शब्द गेले असतील, त्यावर माझी सपशेल माघार आहे. कारण मी वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे. मात्र सरकारने तुकाराम महाराजांच्या आडून ट्रॅप टाकू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.