शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (08:50 IST)

मराठा आरक्षण : खा. संभाजीराजे सर्वपक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार

मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजी छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.येत्या २ सप्टेंबररोजी ही भेट होणार आहे.संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे.त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
 
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना राष्ट्रपती व केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. सोबत महाराष्ट्रातील खासदारांना देखील समवेत भेटीसाठी वेळ दिली जावे असे कळविले होते. आज त्यांनी प्रमुख राजकीय पक्ष, अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय गटनेते यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे येत्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
५० टक्क्यांची मर्यादा हटवणे आवश्यक
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबत सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींसमोर आपल्या भावना मांडणार आहे. यावेळी राज्यपाल काय सल्ला देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.