गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (12:52 IST)

राज ठाकरे : 'मराठा आरक्षण सर्वपक्षीय नेत्यांना मान्य, मग अडलंय कुठे?'

"मराठा आरक्षण सर्वपक्षीय नेत्यांना मान्य आहे मग अडलंय कुठे?" असा सवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 
राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. तिथं ते माध्यमांशी बोलत होते.
 
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी महाविकास आघाडीसह भाजपलाही टोला लगावला आहे.
 
त्यांनी म्हटलं, "मराठा आरक्षण सर्वपक्षीय नेत्यांना मान्य आहे मग अडलंय कुठे? मराठा तरुण-तरुणींसाठी केवळ अडचणी निर्माण करायच्या आहेत का? ओबीसी आरक्षणाचीही हीच परिस्थिती आहे. मराठा समाजाचा वापर निवडणुकांसाठी केला जातो. याकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे. मतदान द्यायाची वेळ येते तेव्हा हे का पाहिलं जात नाही?"
 
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी हा मुद्दा केंद्र किंवा राज्य सरकारवर आरोप-प्रत्यारोपाचा नाही असंही स्पष्ट केलं.
राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सध्या कोण कोणाचा शत्रु आहे आणि कोण मित्र आहे हेच कळत नाही असंही ते मिश्किलपणे म्हणाले.
 
'खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय'
"एकनाथ खडसे म्हणाले होते माझ्यामागे ईडी लावल्यास मी सीडी दाखवेन. तेव्हा मी सीडीची वाट पाहत आहे," अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिलीय.
 
केंद्रीय तपास यंत्रणांचा सत्ताधारी गैरवापर करत आहेत का? याबाबत बोलताना ते म्हणाले, "ईडी म्हणजे तुमच्या हातातली बाहुली आहे का? अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर काँग्रेसच्या काळातही झाला होता. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. ज्यांनी खरोखर गुन्हे केले आहेत ते मोकट सुटले आहेत."
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पूर्व तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळलं.
 
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत भूमिका कायम
राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची भूमिका मांडली होती.
 
याविषयी बोलताना ते म्हणाले, "नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतील विमानतळाचाच भाग असणार आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही."
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं, तर भाजप आणि नवी मुंबईतील नागरिकांकडून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय.
 
यावर यापूर्वी राज ठाकरे म्हणाले होते, "महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. परदेशातला माणूस इथे येतो तो शिवरायांच्या भूमीत येतो. आंतरराष्ट्रीय विमानतळादेखील छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असेल असं मला वाटतं."
 
"व्हीटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव केंद्र सरकारने ठरवलं. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय नाव आहे. दि.बा.पाटील हे ज्येष्ठ नेते होते. या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असणं उचित आहे", असं राज ठाकरे म्हणाले.