मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (08:36 IST)

श्री पांडुरंगाची आरती

vitthal, pandhapur
जय देव जय देव जय पांडुरंगा । 
आरती ओवाळूं भावें जिवलगा ॥धृ.॥ 
 
पंढरीक्षेत्रासी तूं अवतरलासी । 
जगदुद्धारासाठीं राया तूं फिरसी । 
भक्तवत्सल खरा तूं एक होसी । 
म्हणूनी शरण आलो तुझे चरणासी ॥ 
जय देव जय देव जय पांडुरंगा । 
आरती ओवाळूं भावें जिवलगा ॥१॥ 
 
त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार । 
त्याची काय वर्णूं लीला पामर । 
शेषादिक शिणलें त्या न लागे पार । 
तेथें कैसा मूढ मी करू विस्तार ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा । 
आरती ओवाळूं भावें जिवलगा ॥२॥ 
 
देवाधिदेवा तूं पंढरीराया । 
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ॥ 
तुझसीं अर्पण केली अपुली मी काया । 
शरणागत तारीं तूं देवराया ॥ 
जय देव जय देव जय पांडुरंगा । 
आरती ओवाळूं भावें जिवलगा ॥३॥ 
 
अघटित लीला करूनी जड मूढ उद्धरिले । 
कीर्ति ऎकुनी कानीं चरणीं मी लाळे । 
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें । 
तुझ्या भक्तां न लगे चरणांवेगळें ॥ 
जय देव जय देव जय पांडुरंगा । 
आरती ओवाळूं भावें जिवलगा ॥४॥