शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

भगवान शिवशंकराचा 'तुरूंग'

WDWD
श्रध्दा व अंधश्रद्धा या सदरात आज आम्ही आपल्याला दाखवतोय एक वेगळाच तुरूंग. या तुरूंगाला रखवालदारच नाही. भगवान शिवशंकरच या तुरूंगाची जबाबदारी सांभाळतात. कोड्यात पडलात ना? म्हणूनच हे प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या भोलेनाथ तुरूंगाकडे कूच केले. हे मंदिर मध्यप्रदेशात नीमच या शहराजवळ आहे.

आम्ही येथे पोहोचलो तेव्हा तुरूंगात गजाआड असलेले कैदी नजरेस पडले. ते सर्वजण आपापल्या बराकीच्या आत भजन-कीर्तन करण्यात मग्न झाले होते. येथे प्रत्येक कैद्याला विशिष्ट क्रमांक दिला जातो. काही कैद्यांना येथे येऊन वर्षापेक्षाही जास्त काळ झाला आहे. येथील एका कर्मचार्‍याकडे इथल्या सगळ्या कैद्यांची कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी आहे. या कर्मचार्‍यानेच आम्हाला हा तुरूंग दाखविला. तुरूंगामध्ये पुरूष व स्त्रियादेखिल होत्या. त्यांना तुरूंगाधिकार्‍याच्या आदेशानंतरच येथून सोडले जाते. हा तुरूंगाधिकारी कोणी दुसरा तिसरा नसून भगवान शिवशंकर आहेत.

WDWD
या तुरूंगाला भोलेचा म्हणजे शिवशंकराचा तुरूंग म्हणून संबोधले जाते. येथील तिलसवा महादेव मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे, असे मानले जाते. हे मंदिर जवळपास 2000 वर्षांइतके जुने असल्याचे लोक सांगतात. शंकराचे पूर्ण कुटुंब येथे आहे. मंदिराच्या समोरच गंगा कुंड आहे. या कुंडातूनच गंगा नदीचा उगम झाला होता. या कुंडाची माती असाध्य रोगही बरे करते, अशी येथील लोकांची श्रध्दा आहे. पण यासाठी येथील नियम पाळावे लागतात. भोलेनाथांच्या तुरूंगात कैदी बनून रहावे लागते. पापच आपल्या रोगाचे कारण असून ते तुरूंगात राहून त्याचे प्रायश्चित करतात.

WDWD
आपल्या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी रोगी मंदिराच्या प्रशासनाला एक अर्ज करतो. अर्ज स्वीकारल्यानंतर कैद्याला एक नंबर दिला जातो. त्याला कोणत्या बराकीत रहायचे आहे हे सांगितले जाते. कैद्याच्या खाण्यापिण्याचा खर्च मंदिराचे प्रशासनच करते. त्याला येथे नियमितपणे कुंडातील मातीने स्नान करावे लागते. नंतर डोक्यावर दगड ठेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घालाव्या लागतात. मंदिराच्या साफसफाईचे कामही या कैद्यांनाच करावे लागते. हे कैदी येथे दिवस दिवस, महिनोंमहिने काही वेळा तर वर्षभरही येथे रहातात. भोलेनाथ कैद्याला स्वप्नात दर्शन देऊन तो बरा झाल्याचे सांगतात त्याचवेळी कैद्याची इथून सुटका होते. हेच स्वप्न मंदिराच्या प्रशासनालाही पडते.

येथे कैद्यांना स्वातंत्र्य असूनही हे कैदी मुक्त आहेत, असे कुठेही जाणवत नाही. काही कैद्यांना पाहून त्यांना मानसोपचाराची गरज आहे, असे वाटते. पण या मंदिराच्या पुजार्‍याच्या मते ही सगळी शिवशंभूची कृपा आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. येथे आल्यानंतर असाध्य रोग असलेले लोकही बरे होतात. पण त्यासाठी त्यांना नियमांचही पालन करावे लागते, असे त्याचे म्हणणे आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा.