गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

मध्यरात्रीची अघोरी साधना

ShrutiWD
मध्यरात्रीची वेळ... आसमंत अंधारात बुडालेला...अशावेळी आपण निद्रादेवीच्या आधीन झालेले असतो. पण तांत्रिक आणि मांत्रिक यावेळी जागे असतात. पण या भलत्यावेळी ते करतात तरी काय. या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही सुरवातीला तांत्रिकाचा शोध सुरू केला. या शोधातच आम्ही पोहोचलो सेवेंद्रनाथ दादाजी यांच्यापर्यंत. सेवेंद्रनाथ हे दादाजी या नावाने प्रख्यात आहेत. पहिल्यांदा तर ते याविषयी काही सांगायला तयार होईना.

पण त्यांची थो़ड़ी मनधरणी केल्यानंतर ते बोलू लागले. त्यांनी सांगितले, की स्मशानात तीन प्रकारच्या साधना केल्या जातात. स्मशान साधना, शिव साधना आणि शव साधना. यात शवसाधना सर्वांत कठिण मानली जाते. ती विशिष्ट वेळीच केली जाते.

जळत्या चितेवर बसून ही साधना केली जाते. पुरूष साधक असेल तर शव स्त्रीचे हवे आणि स्त्री साधक असेल तर पुरूषाचे शव पाहिजे. दादाजींच्या म्हणण्यानुसार ही साधना अंतिम टप्प्यात पोहोचते, तेव्हा ते शव बोलू लागते आणि आपल्या इच्छा पूर्ण करते. या साधनेच्या ठिकाणी सामान्य नागरिकांना प्रवेश वर्ज्य असतो. तारापीठ, कामाख्या पीठ, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथील स्मशानात ही साधना केली जाते. शिव साधनेत शवावर पाय ठेवून साधना केली जाते. शिवाच्या छातीवर पार्वतीने ठेवलेला पाय हे या साधनेचा आधार आहे. या साधनेत शवाला प्रसाद म्हणून मांस आणि मद्य चढविले जाते.

स्मशान साधनेमध्ये सामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतात. यात शवाच्या ऐवजी त्याला जेथे ठेवले जाते, त्या जागेची पूजा केली जाते. त्यावर गंगाजल शिंपडले जाते. येथेही प्रसादाच्या रूपात मांस आणि मद्य दिले जाते. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आम्ही एका अघोरी विद्या करणाऱ्याशी संपर्क साधला. त्याचे नाव चंद्रपाल. त्याने आम्हाला शवसाधना दाखवि्ण्याचे कबूल केले. मात्र, एका अटीवर. शिष्याने निघून जा असे सांगितल्यावर निघून जायचे.

ShrutiWD
आम्ही ती अट मान्य केली. आणि या अघोरी तांत्रिकाबरोबर उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या स्मशानात गेलो. तेथे त्या तांत्रिकाच्या शिष्याने चिता तयार करून ठेवली होती. चंद्रपालने सुरवातीला सर्व स्मशान व्यवस्थित न्याहाळले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य दिसू लागले. थोड्यावेळाने त्याने क्षिप्रा नदीत जळते दिवे सोडले. या क्रियेने म्हणे आत्म्याला स्मशानापर्यंत येण्याचा मार्ग दिसतो.

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा...
WDWD
या वातावरणात वेगळाच वास येत होता. राखेचा नि चामडी जळत असल्याचा. या घाणेरड्या आणि काहीशा भितीदायक वाटणाऱ्या वासातच अगरबत्ती आणि धूप यांचा वास मिसळला होता. या वातावरणात अघोरी चंद्रपाल अत्यंत भयप्रद दिसत होता. दीपदान केल्यानंतर तो काहीतरी बडबडला आणि त्याने चितेच्या चारही बाजूंनी रेषा मारली. आम्हाला आत येण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर त्याने तुतारी फुंकली.

या आवाजामुळे इतर भूत आणि पिशाच्च म्हणे साधनेत विघ्न आणत नाहीत. यानंतर अघोरी चंद्रपालने चितेला प्रदक्षिणा घालण्यास सुरवात केली. प्रदक्षिणा घालताना तो काहीतरी पुटपुटतही होता आणि चितेवर पाणीही शिंपडत होता. यानंतर काहीतरी झाले नि अघोरीने जळत्या चितेवर पाय ठेवला. थोडावेळ साधना सुरू राहिली. बराच वेळ अघोरी याच अवस्थेत होता.

एक तास असाच गेला. त्यानंतर अघोरीने पाय बाजूला केला आणि काळ्या कोंबड्याचा बळी देऊन त्याचे मांस व मद्याचा प्रसाद चितेवर चढविला. आपल्या साथीदारांना हा प्रसाद दिल्यानंतर अघोरीने आम्हास तेथून जाण्यास सांगितले. ही वेळ चांडाळ साधनेची होती. यात अघोरी नग्न होऊन पूजा करतो. त्यामुळेच आम्हाला जाण्यास सांगितल्याचे त्याच्या शिष्याने सांगितले. ही साधना अतिशय भयप्रद असते, म्हणे. पण नाईलाजाने आम्ही तेथून निघून गेलो. पण गेल्यानंतरही बरेच प्रश्न मनात राहिले. या सर्व प्रकारांदरम्यान जाणवलेली बाब म्हणजे काही लोक वास्तवापेक्षा वेगळ्याच जगात रममाण असतात.

ShrutiWD
या लोकांच्या जगात गेल्यानंतरच काही शब्दांचा अर्थ कळाला. अघोरी म्हणजे घोर साधना करणारा. ज्या स्मशानात आम्ही दिवसा जायला घाबरतो, तेथे हे रात्री जाऊन साधना करतात. एवढ्या अघोरींना भेटल्यानंतर एक बाब जाणवली ती म्हणजे, जळत्या चितेवर पाय़ ठेवून या सर्वांचे पाय निळे पडले होते. अर्थात त्यांना याचे काहीही वाटत नव्हते. ते केवळ आपल्या साधनेतच मग्न होते. आपल्यापेक्षा वेगळे असलेले हे जग असे होते. काळे, रहस्यमय आणि गूढ.