सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (12:19 IST)

Akshaya Tritiya : सोन्याविषयी या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

gold
विनायक गायकवाड
दसरा असो, धनत्रयोदशी असो वा अक्षय्य तृतीया, सोनं खरेदीसाठी हे विशेष निमित्तच म्हणा. लक्ष्मीपूजन असो वा घरच्या लक्ष्मीची मागणी, सोन्याशिवाय हे सण अपूर्ण आहेत. पण सोनं नेमकं आलं कुठून? आणि ते आपल्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं कधी झालं?
 
जाणून घेऊया या धातूविषयी माहिती नसलेल्या काही असामान्य गोष्टी:
 
1. सगळ्यांत जास्त सोनं कुठे?
जगात सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिका आणि भारतात आढळतं. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे.
 
विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. आणि या खोऱ्याच्या 40 टक्के भागात अजूनही उत्खनन झालेलं नाही.
 
सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण भारतात आहे, जी दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे.
 
हडप्पा आणि मोहंजोदाडोमध्ये सापडलेल्या सोन्याच्या वस्तूंचा संदर्भही कोलार जिल्ह्यातील या खाणीशी जोडला गेला आहे.
 
2003 पासून कोलारमधील ही खाण जरी बंद असली तरी सोन्याच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
दक्षिण आफ्रिका आणि भारतापाठोपाठ उत्तर अमेरिकेमध्ये सोन्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील खाणींत बरंच सोनं सापडतं.
 
2. किंमत कशी ठरते?
सोन्याची किंमत लंडनमधून ठरते. 'लंडन बुलियन मार्केट'मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते -- लंडन वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता आणि दुपारी 3 वाजता ही किंमत ठरवली जाते.
 
या पद्धतीला 'लंडन गोल्ड फिक्स' म्हणतात. अशा पद्धतीने ठरवलेल्या सोन्याच्या दराला जगभरातील इतर मार्केट्समध्ये मान्यता आहे.
 
नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फक्त एकदाच म्हणजे सकाळी सोन्याचे दर निश्चित केले जातात. हे दर अमेरिकन डॉलर्स, पाऊंड आणि युरोमध्ये निश्चित केले जातात.
 
3. भारतात सर्वांत जास्त सोनं कुठे सापडतं?
भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत - कर्नाटकाच्या हुट्टी आणि उतीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी इथं.
 
गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं.
 
2001 मध्ये कर्नाटकातील कोलार खाण बंद करण्यात आली. जगात सोन्याच्या मोठ्या खाणींपैकी ती दुसऱ्या नंबरची खाण होती.
 
4. भारतात सर्वांत जास्त सोनं कुठे साठवलं आहे?
भारतात सर्वांत जास्त सोनं मंदिरांमध्ये आहे. केरळच्या तिरुवनंथपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती धन आहे, याचा नेमका अंदाज अजून कोणालाच नाही.
 
पण 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा मंदिराचा खजिना उघडला गेला त्यात सोन्याच्या मूर्ती, भांडी, दागिने, नाणी आणि मौल्यवान रत्नं सापडली.
 
त्याची किंमत जवऴपास 100 अब्ज आहे. जर ही आकडेवारी थक्क करणारी आहे, तर हे वाचा - या खजिन्यातील एक तिजोरी अजून उघडण्यात आलेलीच नाही.
 
आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरामधल्या सोन्याचा साठा सर्वश्रूत आहे. गेल्या वर्षी तिरुपती बालाजी मंदिरानं 1,311 किलो सोनं पंजाब नॅशनल बँकेत जमा केलं होतं.
 
यावर्षी या मंदिराच्या ट्रस्टने तब्बल 2,780 किलो सोनं स्टेट बँक ऑफ इंडियात जमा केलं आहे.
 
या सोनेरी आकड्यांच्या जोरावर ही दोन मंदिरं भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरं ठरतात.
 
5. सरकारने कुठं दडवून ठेवलं आहे सोनं?
भक्तांच्या दानातून खासगी सोनं जसं मंदिरांमध्ये जमा होतं तसं सरकारकडून सर्वांत जास्त सोनं बँकांच्या लॉकर्समध्ये साठवलं जातं.
 
आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल 600 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं आहे. आणि भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात साठवला आहे.
 
1956 साली भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या परवानगीनंतर मुंबई ऑफिसमधून लष्कराच्या कडक सुरक्षेत देशाचं सोनं नागपूरला नव्या तिजोरीत हलवलं.
 
तेव्हापासून आजपर्यंत भारत सरकारचं सोनं हे परकीय आक्रमणांना लक्षात घेऊन नागपूरमध्येच ठेवण्यात आलं आहे.
 
6. जगातील सगळ्यांत मोठी सोन्याची बाजारपेठ कोणती?
भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सर्वांत जास्त दागिने विकले जातात.
 
तज्ज्ञांच्या मते भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीनं भारतात सोनं विकलं जातं.
 
भारताची सोनं उत्पादन क्षमता जरी कमी असली तरी जास्तीत जास्त सोनं आयात करून आणि त्याची विक्री करुन भारत जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ बनला आहे.
 
7. गुंतवणूक म्हणून सोनं का साठवतात?
आपल्याकडे सोन्याला एक वेगळं महत्त्व आहे. कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक सांगतात, "सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात धोका कमी असतो. सोनं जर विकलं तर त्याचे आपल्याला अगदी लगेच पैसे मिळतात."
 
"सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा मोबदला तितकाच मिळण्याची शक्यता जरी कमी असली, तरी भारतात सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते."
 
8. सोनं कोणत्या स्वरूपात?
सोनं म्हटलं की फक्त दागिने आठवत असले तरी जगभरात जास्तीत जास्त सोनं हे नाणी आणि बिस्किटांच्या स्वरुपात साठवलं जातं.
 
युरोपात आणि अमेरिकेत सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून नाणी किंवा बिस्किटांच्या स्वरुपात सोनं साठवलं जातं.
 
भारतात सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघितलं जात नाही. त्यामुळे भारतात सोनं जास्त प्रमाणात दागिन्यांच्या स्वरुपात साठवलं जातं.
 
9. चलन आणि सोन्याचं काय नातं आहे?
सध्या भारतात चलन आणि सोन्याचं कोणतंही नातं नाही. याअगोदर देशाकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यानुसार चलन छापलं जायचं.
 
त्यामुळे त्या देशाच्या चलनाला राखीव निधी म्हणून सोन्याचा आधार होता. भारतातही हीच पद्धत होती. पण आता रुपया आणि सोन्यात कोणताही संबंध नाही.
 
1971 मध्ये अमेरिकेनंही राखीव निधी म्हणून सोन्याला बाद ठरवलं होतं.