1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (12:52 IST)

Adani Group News: अदानी ग्रुपला मोठा फटका!

gautam adani
Adani Group News: हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी समूहाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. न्यूयॉर्कच्या शेअर बाजार डाऊ जोन्सने मोठा धक्का देत अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसला S&P Dow Jones Indices मधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजाराने जारी केलेल्या नोटनुसार अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकले जाईल. अदानी एंटरप्रायझेसबाबत ही कारवाई स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडच्या आरोपांचे विश्लेषण केल्यानंतर करण्यात आली आहे.
 
 हिंडेनबर्गच्या अहवालानंतर निर्णय घेतला
यापूर्वी अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने हा निर्णय घेतला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाने एफपीओ रद्द करण्याचा हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयानंतर, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले होते की, विलक्षण परिस्थितीमुळे, कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की FPO पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य होणार नाही.
 
हा निर्णय 7 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे
गौतम अदानी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले होते की आमच्यासाठी गुंतवणूकदारांचे हित सर्वोपरि आहे आणि त्यांना कोणत्याही संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी संचालक मंडळाने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन बाजाराने घेतलेला हा निर्णय 7 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये मोठी घसरण होत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचा शेअर NSE वर 55 टक्क्यांनी घसरून 1,565 रुपयांवर आला. शुक्रवारीही हा शेअर 25 टक्क्यांच्या घसरणीसह 1174 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.
 
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने देखील अदानी समूहाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. NSE ने 3 फेब्रुवारी 2023 रोजी व्यापारासाठी फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) वर बंदी घातली आहे. समूहाच्या तीन कंपन्यांवर यापूर्वीच पाळत ठेवण्यात आली आहे. या पावलानंतर एनएसईने जारी केलेल्या निवेदनात कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवले जाईल, असे म्हटले आहे. शेअर्समध्ये होणारे प्रचंड चढउतार रोखणे हा या पावलामागचा उद्देश आहे.
Edited by : Smita Joshi