सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर 50 हजार पार
कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे मुंबईत सोन्याचे दर 50 हजार पार गेले आहेत. जीएसटीसह मुंबईत प्रतितोळा सोनं 50,372 रुपये किंमत झाली आहे. तसेच चांदीचे दर प्रतिकिलो 52,400 रुपये इतके झाले आहेत.
दरम्यान, घरेलू सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होताना दिसली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार नवी दिल्लीत शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली. यासह दिल्लीतील सोन्याचे दर 49,959 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोन्याच्या दरातील ही वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांमुळे झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.
दरम्यान, जळगावात 2 जुलै रोजी सोन्याच्या भावाने 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता . गुरुवारी सकाळी सराफ बाजार उघडला तेव्हापासून सोन्याचे भाव (जीएसटीसह) 51 हजार 500 रुपये इतके होते. येत्या आठवडाभरात सोन्याचे भाव 53 हजार रुपये प्रतितोळा असतील, असा अंदाजही सराफ व्यावसायिकांनी वर्तवला होता. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचं बोललं जात आहे.