शेंगदाणा सर्वसामान्यांना परवडेना! किरकोळ बाजारात भाव कडाडले..
Common people cant afford peanutsकिराणासह उपवासाचे सारे जिन्नसही महागले आहेत. शेंगदाणा आणि साबुदाणा यांच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. १३० ते १४० रुपये किलो मिळणारा शेंगदाणा आता १५० ते १६० रुपये किलो दराने घ्यावा लागत आहे.
श्रावणमासाला सगळीकडे उत्साह असतो. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. त्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात होते. मात्र शेंगदाण्याच्या तुटवड्यामुळे दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही घाऊक बाजारात सर्व प्रकारचे शेंगदाण्याचे दर क्विंटल मागे दोनशे ते चारशे रुपयांनी वाढले. सध्याचे दर या वर्षातील सार्वधिक मानण्यात येत आहेत. आगामी सणासुदीच्या काळात शेंगदाण्यास मागणी अधिक असते. पुरवठा स्थिती सुधारली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पोह्यांमधील तेजी कायम असून, मागणी साधारणच असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरात मध्ये बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली असून, दुबार पेरनीचे संकट निर्माण झाल्याचे वृत्त आहे. भुईमूग शेंगेच्या पिकाला फटका बसला असून तिळाचे पीक भुईसपाट झाले आहे. यामुळे शेंगदाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शेंगदाणा तेलाचे दरही कडाडले आहेत. त्याचप्रमाणे युक्रेन मधून येणाऱ्या सूर्यफूल तेलाचा आयातीवर परिणाम झाला आहे.
त्याचप्रमाणे किराण्यातील सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. किरकोळ बाजारात १०५ रुपये लिटर असलेले सोयाबीन तेल ११० रुपयांपर्यंत गेले आहे. यामुळे महिन्याच्या तेलाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे तूरडाळ ही १५० ते १५५ रुपये किलो पर्यंत पोहोचली असून, यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मध्यंतरी खूपच वाढलेले खाद्य तेलाचे दर गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र विविध कारणांमुळे मागील चार ते पाच दिवसांपासून तेलाचा दरामध्ये चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. आवक जावक साधारण असल्यामुळे अन्नधान्ये, साखर, गुळ यांचे दर मात्र स्थिर आहेत.