रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:27 IST)

इंधन दरात सलग सातव्या दिवशीही वाढ

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग सातव्या दिवशीही भडकले आहेत. सौदी अरेबियातील प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात पाच टक्क्यांची घट झाली आहे. दरवाढीतील सातत्य हा त्याचाच परिणाम आहे.
 
पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक दिवशी वाढत चालले आहेत. पेट्रोल-डिझेलचा नवा दर सकाळी सहा वाजता लागू होतो. त्यावर एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर हे दर जवळपास दुप्पट होतात. सोमवारी मुंबईत पेट्रोलची किंमत २८ पैशांनी वाढली. प्रतिलिटर दर ७९.५७ रुपये झाले आहेत. तर डिझेलमध्येही २१ पैशांची वाढ होऊन प्रतिलिटर दर ७०.२२ रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे २९ पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटरमागे १९ पैशांनी वाढले आहेत.
 
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईत पेट्रोलचे दर क्रमशः वाढून ७३.९१ रुपये, ७९.५७ रुपये, ७६.६० रुपये आणि ७६.८३ रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर या चार महानगरांत डिझेलचे दर वाढून क्रमशः  ६६.९३ रुपये, ७०.२२ रुपये, ६९.३५ रुपये आणि ७०.७६ रुपये प्रति लीटर झाले आहेत.