शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (20:55 IST)

टोमॅटोमुळे सोन्याचे दिवस..! शेतकरी दाम्पत्य दिवसाला करतंय तब्बल 18 लाखांची कमाई

पुणे : गेली दोन वर्ष टोमॅटो या पिकाला बाजारभाव न मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व टोमॅटो मार्केट फुल्ल असल्याचे पहायला मिळत आहे.
 
टोमॅॅटो मुळे जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याचं या टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.
 
जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या गावाचा कायापालट झाला आहे. या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. त्यांची परंपरागत शेती आहे. या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर शेती बघतात. ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे.
 
गायकर यांना टोमॅटो विक्रीसाठी पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मार्केट जवळ आहे. त्यामुळे ते तिकडे टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास १३ हजाराहून अधिक टोमॅटो क्रेट विक्री केले. असून त्यातून त्यांना सव्वा कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकच दिवशी ९०० क्रेटची विक्री केली त्यातून त्यांनी एकच दिवशी १८लाख रुपये मिळाले आहेत. ते सात वर्षांपासून टोमॅटो लागवड करतात.
 
गायकर दाम्पत्याला मागच्या महिनाभरात त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या क्रेटला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तालुक्यातील टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यानं महिनाभरात बाजार समितीची जवळपास ८० कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे.
 
यंदाच्या वर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे. यामध्ये गायकर दाम्पत्य देखील करोडपती बनलंय. चांगल्या टोमॅटोला नारायणगाव मार्केट येथे सर्वांत उच्चंकी म्हणाजे २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे.
 
यंदाच्या वर्षी टोमॅटो बागांची मशागत ,तोडणी, क्रेट भरणे, फवारणी यांचे व्यवस्थापन ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन तर चांगले बसलेच पण या टोमॅटोमुळे जवळपास १०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.