इंडिपेन्डन्स को- ऑप. बँकेचा परवाना रद्द
आर्थिक नियमांचे उल्लंघन, गैरव्यवहार केल्या प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिकच्या इंडिपेन्डन्स को-ऑप. बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे गुरुवारपासूनच या बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे.
इंडिपेन्डन्स बँकेबाबत गत चार ते पाच वर्षांपासून सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने तक्रारी सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर इंडिपेन्डन्स बँकेचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागानेदेखील रिझर्व्ह बँकेला काही काळापूर्वी पाठवला होता. तसेच बनेकवर प्रशासक नियुक्त करण्याचाही प्रस्ताव होता. बँक दिवाळखोरीत निघाली असून बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कामकाजासाठी योग्य स्थिती नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलाम ५६ सह अन्य कलमातील तरतुदींचे पालन बँकेकडून झालेले नाही. त्यामुळे बँकेला बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. १९६१ च्या तरतुदीच्या अधीन राहून बँक दिवाळखोरीत निघाली तरी ठेवीदाराला ठेवींच्या पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार राहणार आहे.
दरम्यान या बँकेची स्थापना दोन दशकांपूर्वी झाली असून सुमारे सातशेहून अधिक सभासद बँकेचे आहेत. बँकेचे संस्थापक अध्यक्ष रौफ पटेल असून योगेश खैरे हे अध्यक्ष तर आमदार सीमा हिरे या उपाध्यक्ष आहेत.