मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (13:39 IST)

गॅस भडकणार; सिलिंडर 100 ते 150 रुपयांनी महागणार?

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला यावर्षामध्ये अजून झळ बसण्याची  शक्यता आहे. कारण येत्या वर्षात स्वंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढणची चिन्हे आहेत. असे झाल्यास आता ज्या दरात गॅस सिलिंडर मिळतो त्यापेक्षा ग्राहकांना 100 ते 150 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. 
 
जुलै 2019 ते जानेवारी 2020 या काळात गॅस सिलिंडरच्या किमतीत सरासरी 10 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर सध्या भडकल्याचे दिसत आहेत. आता येत्या काळातही ही वाढ होत राहतील, असे समजते. गॅस कंपन्यांचा फायदा होणार असला तरी ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत कमी झाल्या आहेत. त्यामुळे सरकार तेल कंपन्यांना अनुदानापोटी देणारी रक्कम थोडी-थोडी कमी करु शकते. जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 या काळात तेल कंपन्यांनी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती 63 रुपांनी वाढवल्या आहेत. म्हणजेच सहा महिन्यांमध्ये दर महिन्याला 10 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमती पाहता जर पुढील 15 महिने जर याच 10 रुपये दराने भाववाढ होत राहिली तर तेल कंपन्यांना सरकारच्या अनुदानाची गरज लागणार नाही.
 
सध्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 557 रुपयांच्या आसपास आहे आणि सरकार तेल कंपन्यांना 157 रुपायांचे अनुदान देते. हे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. कंपन्यांनी  दरवाढ सुरू ठेवल्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 60 डॉलर प्रति बॅरेल राहिल्यास सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाची रक्कम घटवली जाऊ शकते. मात्र, असे झाल्यास सिलिंडरचे भाव 100 ते 150 रुपयांनी वाढतील.