शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (14:46 IST)

किशोर बियाणी: डिस्को दांडिया ते बिग बझार; किंग ऑफ रिटेल ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

kishore biyani
मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पँटलून्स, बिग बझार, फूड बझार आणि सेंट्रल मॉल ही नावं अगदी तोंडपाठ असतील. एकेकाळी भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये परवडणाऱ्या दरात फॅशन उपलब्ध करून देण्यामध्ये या ब्रँड्सचा मोठा हात होता.
 
या ब्रँडच्या शोरूमची साखळी तयार करणाऱ्या फ्युचर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ किशोर बियाणी यांनी भारतीय उद्योजकांमध्ये 'किंग ऑफ रिटेल' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
 
त्यांनी देशाच्या संस्कृतीचं बाल्यावस्थेपासून प्रौढत्वापर्यंत होणारं संक्रमण पाहिलं आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी देशातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये बिग बाजार सुरू केले.
 
पँटलून, बिग बाजार, फूड बझार आणि सेंट्रल यांसारख्या ब्रँडसह बियाणी यांनी रिटेल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली.
 
नंतर, बियाणी यांच्या कंपनीने आर्थिक सेवा, चित्रपट निर्मिती आणि वाहतूक आणि वितरण या क्षेत्रात पाऊल टाकले.
 
बियाणी यांना कौटुंबिक व्यवसायापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. त्यांनी डिस्को-दांडियापासून सुरुवातीचे धडे घेतले. मॉल मॅनेजमेंटबद्दल त्यांना भारतीय आणि परदेशी तज्ञांकडून सल्ले मिळाले, पण व्यवसायाचे खरे धडे त्यांना मंदिरातूनच मिळाले.
 
बियाणी यांनी संकटकाळात भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमलं नाही आणि कायदेशीर लढाई सुरू झाली.
 
आज त्यांची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अलीकडेच जिंदाल समूहाने बियाणी यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र तरी सुद्धा कंपनीला भविष्य दिसत नाही. यात गुंतवणूकदाराला कर्जदारांच्या स्वीकृतीपासून कायदेशीर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया अवलंबावी लागते.
 
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फ्युचर ग्रुपवर 19 हजार 400 कोटींचं कर्ज आहे. प्रमुख कर्जदार बँकेने फ्युचर रिटेलच्या आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केल्यावर बियानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
डिस्को दांडिया आणि मंदिरातून मिळाले व्यवस्थापनाचे धडे
 
किशोर बियाणी यांचा जन्म तत्कालीन मुंबई शहरातील एका श्रीमंत मारवाडी कुटुंबात 9 ऑगस्ट 1961 रोजी झाला. त्यांचे आजोबा बन्सीलाल राजस्थानमधून देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांनी कापडाच्या दुकानापासून सुरुवात करत स्वतःच्या कापड गिरण्या सुरू केल्या.
 
बियाणी कुटुंबातील प्रमुख लक्ष्मीनारायण, त्यांचे भाऊ आणि पुढं मुलं या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. मात्र किशोर यांना लहानपणापासूनच कौटुंबिक व्यवसायात सामील व्हायचं नव्हतं. त्यांना कायम वेगळं काहीतरी करायचं होतं.
 
बियाणी हे 'इट हॅपन्ड इन इंडिया' या फ्युचर ग्रुपच्या पुस्तकाचे सह-लेखक आहेत. त्याला त्यांचं आत्मचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
 
या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात ते लिहितात, "नवरात्रीच्या काळात गुजराती तरुण-तरुणी दांडिया खेळतात, संगीताच्या तालावर फेर धरतात. पण आमच्या समाजात हे कंटाळवाणं वाटतं. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना, एक मित्र मला जुहू येथील दांडिया महोत्सवात घेऊन गेला.
 
जिथे प्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार राजेश रोशन यांचं लाइव्ह म्युजिक सुरू होतं. तरुण-तरुणी बेधुंदपणे नाचत होते. एवढ्या मोठ्या संख्येने तरुण-तरुणी एकाच ठिकाणी जमलेले मी पहिल्यांदाच पाहिलं. ते एक अद्भुत वातावरण होतं आणि त्याची भव्यता पाहून मी प्रभावित झालो."
 
किशोर यांनी पुढच्याच वर्षी त्यांच्या सोसायटीत डिस्को दांडिया आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
 
किशोर पुस्तकात लिहितात की, 'ही योजना यशस्वी झाली आणि त्यानंतरच्या काही वर्षांतच आसपासच्या परिसरात नाव झालं. यातून गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापनाचे धडे मिळाले.'
 
बियाणी यांनी 'ना तुम जानो ना हम' या चित्रपटाची निर्मिती केली.
 
या चित्रपटाला राजेश रोशन यांनी संगीत दिलं, तर त्यांचा पुतण्या ऋतिक रोशन हा नायकाच्या भूमिकेत होता. याशिवाय त्यांनी 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटाचीही निर्मिती केली.
 
नंतरच्या काळात बियाणी यांनी 'बिग बझार' ही रिटेल चेन सुरू केली. याचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'सब से सस्ता दिन'.
 
या दिवसांत मोठी गर्दी व्हायची. जमाव नियंत्रित करण्यासाठी बिग बझारच्या कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना मोठी अडचण यायची.
 
बियानी त्यांच्या पुस्तकात लिहितात की, गर्दीचं नियंत्रण आणि नियमन कसं करायचं हे मोठं आव्हान होतं. यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी मंदिरांमधून धडा घेतला.
 
कंपनीच्या अधिकार्‍यांनी मंदिरांमध्ये गर्दी असताना भाविकांची रांग कशी लावायची, त्यांना दर्शनासाठी मंदिरात कसं पाठवायचं याचा अभ्यास केला आणि मग बिग बझारच्या आऊटलेट्सवर त्याची अंमलबजावणी केली.
 
बिग बझार, एक मोठी झेप
1987 मध्ये बियानी यांनी 'पँटलून्स'ची स्थापना केली. ही कंपनी पुरुषांसाठी पँट बनवायची. बियानी लिहितात की, त्यांनी मुंबईतील एका मल्टी-स्टोअर किरकोळ विक्रेत्याला त्यांच्या पॅंट दुकानात ठेवण्यास सांगितलं.
 
पण आपण परदेशी ब्रँड्स आणले आहेत असं कारण देत त्याने पँट ठेवण्यास नकार दिला. मुंबईतील मॉल मध्येही कंपनीला जागा मिळाली नाही.
 
त्यामुळे बियाणी यांनी कलकत्त्यापासून सुरुवात करून किरकोळ विक्री करण्याचा आणि स्वतःची उत्पादने विकण्याचा निर्णय घेतला. दैनंदिन गरजेच्या वस्तूंना एकाच छताखाली आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. काही उद्योजक या क्षेत्रात आधीच कार्यरत होते.
 
बिग बझारला जेव्हा सुरुवातीच्या काळात अपेक्षेप्रमाणे ग्राहक मिळाले नाहीत तेव्हा त्यांनी सल्लागार नेमले. या सल्लागारांनी वॉलमार्ट आणि टेस्को सारख्या कंपन्यांना बदल सुचवले होते. दोन्ही कंपन्या अनुक्रमे अमेरिका आणि ब्रिटनच्या किरकोळ व्यापारात यशस्वी ठरल्या.
 
पण बियाणी यांना लवकरच लक्षात आलं की ग्राहकांना बाजारात खरेदी करण्याची भावना मिळाली पाहिजे. त्यामुळे पॅकेज केलेल्या वस्तूंव्यतिरिक्त त्यांनी किरकोळ किराणा माल, फळे आणि भाजीपाला विकण्यासही सुरुवात केली.
 
जिऑफ हिस्कॉक त्यांच्या 'इंडियाज स्टोअर वॉर्स' (पृष्ठ क्र. 9-10) या पुस्तकात लिहितात की, बियाणी यांनी प्रसिद्ध दक्षिण भारतीय ब्रँड 'सरवाना'चा अभ्यास करण्यासाठी कित्येक आठवडे घालवले. हा असा एक ब्रँड होता ज्याने 'देशातील सर्वात स्वस्त' उत्पादन देण्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी 'कमी नफा आणि अधिक व्यापार' ही रणनीती स्वीकारली.
 
बिग बाजार वर्षातील 72 दिवस सेल ठेऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. बुधवारी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात विकल्या जायच्या. या दिवशी गृहिणी आवश्यक पण महाग असलेली वस्तू कमी दरात खरेदी करायच्या.
 
2007 मध्ये, बियानी अब्जाधीश झाले आणि फोर्ब्सच्या यादीनुसार देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 54 व्या स्थानावर पोहोचले. मात्र, 2008 च्या आर्थिक मंदीनंतर त्यांच्या अडचणी वाढू लागल्या.
 
अडचणी, चुका, भविष्य
2008 च्या आर्थिक मंदीचा फटका फ्युचर ग्रुपलाही बसला. एकामागून एक किरकोळ ब्रँड लॉन्च करणे, विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टोअर्स उघडणे आणि कर्जाचा बोजवारा उडाल्याने कंपनीचा ताळेबंद दबावाखाली जाऊ लागला.
 
हा असा काळ होता जेव्हा मल्टी-ब्रँड रिटेलमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी नव्हती. त्यामुळे बियानी यांना बँकांव्यतिरिक्त इतर माध्यमांतून पैसे उभारणे कठीण झाले.
 
2012 मध्ये बियाणी यांनी कर्ज कमी करण्यासाठी आदित्य बिर्ला समूहाला त्यांच्या यशस्वी ब्रँड पँटलून्स मधील भागभांडवल विकले आणि नंतर कंपनीच त्यांना विकली.
 
देशात हळूहळू ऑनलाइन खरेदी वाढत होती. इबे (eBay) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) सारख्या कंपन्यांबरोबरच जगातील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी ॲमेझॉन (Amazon) ने देखील बाजारात प्रवेश केला.
 
हा बदल खूप वेगाने होत होता. भरघोस सूट आणि स्वस्त इंटरनेटमुळे देशात खरेदीदारांचा नवा वर्ग तयार झाला. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर बिकट परिस्थिती ओढावली.
 
ऑगस्ट-2019 मध्ये, ऑनलाइन रिटेलर कंपनी ॲमेझॉनने आपली ऑफलाइन उपस्थिती वाढवण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्या बिग बझारमध्ये 49 टक्के हिस्सा विकत घेतला. त्यानंतर सुमारे अडीच अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बियाणी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत दिसले ते शेवटचे.
 
कराराची प्रक्रिया सुरू असताना, जानेवारी 2020 मध्ये कोव्हिड साथरोगाने जगाला तडाखा दिला. मार्च 2020 लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यात आले. अशा वेळी जीवनावश्यक वस्तूही ऑनलाइन खरेदी करण्याचा कल वाढला. त्यानंतर पहिल्या तीन ते चार महिन्यांत कंपनीचा सात हजार कोटींचा महसूल बुडाला.
 
ऑगस्ट 2020 मध्ये, देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्युचर समूहाच्या 19 कंपन्या 24 हजार 713 कोटींना विकत घेण्याचा निर्णय जाहीर केला. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा रिटेल व्यवसाय सांभाळते. आधीच गजबजलेली स्टोअर्स असल्यामुळे रिलायन्स रिटेलसाठी हे एक मोठं यश ठरलं असतं.
 
मात्र, फ्युचर ग्रुपसोबत आधीच करार असलेल्या अॅमेझॉनने या कराराला कोर्टात आव्हान दिलं. कायदेशीर पेच वाढू लागल्याने रिलायन्सने एप्रिल 2022 मध्ये हा करार रद्द केला. यापूर्वी, रिलायन्सने अनेक स्टोअरचे प्रशासकीय व्यवस्थापन ताब्यात घेतले होते आणि जागा भाडेतत्त्वावरही घेतल्या होत्या.
 
पैशाअभावी बियाणींचा त्रास वाढतच गेला. शेवटी त्यांना कंपनी दिवाळखोरीत गेलीय असं जाहीर करावं लागलं. राज शामानी यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये बियाणी म्हणाले, "आम्ही दोन व्यावसायिकांमध्ये अडकलो होतो. आमचा ताळेबंद ताणला जात होता आणि आम्हाला पाहिजे तसं झालं नाही."
 
त्यांना वेगळं काय करायला आवडेल असं विचारलं असता ते म्हणाले, "मला आक्रमकपणे विस्तार करायचा नाही आणि हळूहळू जायला आवडेल. मी कंपनीमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देऊ इच्छितो. माझ्याकडे असलेल्या संसाधनांचा सुज्ञपणे वापर करू इच्छितो."
 
हा फ्यूचर ग्रुपचा भूतकाळ होता. आता दिवाळखोरीची प्रक्रिया कशी पुढे जाते आणि नवीन खरेदीदार कोण असणार यावर त्यांचं भविष्य अवलंबून असेल.